Munjya Movie :  बॉलीवूडमध्ये सध्या मराठी दिग्दर्शकांचा दबदबा पाहायला मिळतोय. समीर विद्वंस, आदित्य सरपोतदार (Aditya Sarpotdar) यांसारख्या दिग्दर्शकांच्या गोष्टी बॉलीवूड आणि प्रेक्षकांना आवडत असल्याचं चित्र असून त्याचा परिणाम बॉक्स ऑफिसवरही दिसतोय. नुकताच आलेला आदित्य सरपोतदारचा 'मुंज्या' (Munjya) हा सिनेमा त्यातीलच एक आहे. कमी बजेट, मोठी स्टारडम नसतानाही मुंज्याने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केलीये. अवघ्या चारच दिवसांत या सिनेमाने त्याचं बजेट कव्हर केलं. पण मराठी दिग्दर्शकाचा हा सिनेमा मराठीत का तयार झाला नाही? असा प्रश्न प्रेक्षकांना पडतोय. त्यावर स्वत: दिग्दर्शक आदित्य सरपोतदारने एबीपी माझासोबत बोलताना भाष्य केलं आहे. 


मुंज्याने 50 कोटींचा टप्पा पार केला असून आता हा सिनेमा 100 कोटींच्या घरात जाऊ शकतो अंसही म्हटलं जातंय. कारण अवघ्या दहा दिवसांतच या सिनेमाने 50 कोटींचा टप्पा पार केला.  त्यामुळे एका मराठी दिग्दर्शकाचा सिनेमा बॉलीवूडमध्ये वरचढ ठरणार का याचं चित्रही काही दिवसांत स्पष्ट होईल. पण मुंज्या कोट्यवधी रुपयांचा टप्पा कसा काय गाठू शकला याविषयी देखील आदित्यने एबीपी माझासोबत संवाद साधला. 


मुंज्या मराठीत का केला नाही?


मुंज्या मराठीत का केला नाही यावर बोलताना आदित्यने म्हटलं की, मला नेहमी वाटतं की ही गोष्ट मराठीत झाली असती, पण मला मोठा प्रेक्षक वर्ग मिळाला नसता. मी उदाहरण दिलंच, कांतारा त्यांनी त्यांच्या भाषेत करुन त्याला मास रिलीज केलं, मी मुंज्या मराठीत करुन ते करु शकलो असतो. पण आजही जेव्हा एखादा मराठी सिनेमा आपण मास रिलीज करायला जातो, तेव्हा आजही त्याला मर्यादा आहेत. त्याला बरीच कारण देखील आहेत. 


पुढे त्याने म्हटलं की, मला ही कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवायची होती. हा सिनेमा मॅडॉकलाही हिंदीतच करायचा होता.  मलाही ते हिंदी मराठी करत बसण्यापेक्षा सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवणं जास्त महत्त्वाचं होतं. पण मराठीतही चांगल्या गोष्टी आहेतच की, अल्याड पल्याड सारखे सिनेमे आहेत.मी याआधी झोंबिवली केला होता तो मराठीतच केला. उलट आता मला तो हिंदीत करण्यासाठी विचारत आहे. पण ती डोंबिवलीची गोष्ट होती, त्यामुळे तो मराठीतच व्हायला हवा होता. यापुढे जर एखादा चांगला सिनेमा सुचला तर आणि गोष्ट तशी असेल तर मी तो मराठीतच करेन.


ही बातमी वाचा : 


Munjya Box Office Collection Day 10 : 'मुंज्या'ने बॉक्स ऑफिसला याड लावलं, 10 दिवसांत किती केली कमाई?