Pune Accident पुणे : गेल्या महिन्याभरापासून विद्येचे माहेरघर असलेले पुणे शहर (Pune) अनेक अपघातांच्या (Pune Hit And Run Case) मालिकेमुळे राज्यासह देशपातळीवर चर्चेत आले आहे. अशातच पुण्यातील येरवड्यातील गोल्फ कोर्स चौकात आणखी एक अपघात झाला आहे. यात आलिशान मर्सिडीज बेंज गाडीखाली चिरडून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय. मंगळवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास हा अपघात झालाय. या प्रकरणी मर्सिडीज बेंजच्या चालकाला ताब्यात घेण्यात आले असून येरवडा पोलीस ठाण्यात यातील कार चलकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 


केदार मोहन चव्हाण (वय 41) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर मर्सिडीज बेंजचा चालक नंदू अर्जुन ढवळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वैद्यकीय तपासणीसाठी त्याला रुग्णालयात  नेण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर या अपघतामुळे पुणे शहर पुन्हा एकदा हादरले आहे.  


र्सिडीज गाडीखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी एक वाजताच्या सुमारास येरवड्यातील गोल्फ कोर्स चौकातून केदार चव्हाण हे दुचाकीने जात होते. यावेळी दुचाकी स्लिप झाल्याने केदार चव्हाण रस्त्यावर कोसळले. याचवेळी पाठीमागून येणारी मर्सिडीज बेंज गाडी त्यांच्या अंगावर गेली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या चव्हाण यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झालाय. अपघाताची माहिती समजतात येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी कारचालकाला ताब्यात घेतले असून अधिक तपास सध्या सुरू केला आहे.


पुण्यात अपघातांची मालिका सुरूच!


पुण्यातील धनाढ्य बिल्डर विशाल अग्रवालच्या अल्पवयीन पोरांने आलिशान पोर्शे कारने दारूच्या नशेत कल्याणीनगरमध्ये दोघांना रस्त्यावर चिडून मारल्यानंतर पुण्यामध्ये गेल्या 25 दिवसांमध्ये अपघाताची मालिका सुरूच आहे.पोर्शे कार अपघात प्रकरणाने पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली असतानाच व्यवस्था सुद्धा कशी पोखरली गेली आहे याचा सुद्धा नमुना समोर आला. या प्रकरणात कायदेशीर कारवाईने वेग घेतला असला, तरी पुण्यामधील रस्त्यावरच्या परिस्थितीमध्ये किंचितही सुधारणा झालेली नाही. 


19 मे ते 14 जून 2024 या कालावधीमध्ये पुण्यामध्ये तब्बल 70 अपघात घडले आहेत. या अपघातांना सर्वाधिक कारणीभूत पुण्यातील वाहनांचा भरधाव वेग कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे भरधाव वाहनांचा वेग पुणेकरांच्या जीवावर उठल्याचे दिसून येत आहे. दारू पिऊन वाहने चालवण्याची संख्या सुद्धा मोठी आहे. अपघात झालेल्या सर्वच प्रकरणांचा उलगडा झाला नसला, तरी काही चालक पोलिसांच्या ताब्यात आहेत. अपघातानंतर काही चालक अजूनही फरार आहेत. त्यामुळे पुण्यामध्ये अक्षरशः मृत्यूचे तांडव सुरू आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या