Actress Sulochana:  ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी (Sulochana) यांच्या पार्थिवावर उद्या, 5 जून रोजी अंत्यसंस्कार होणार आहेत. सुलोचना दीदी (Sulochana Didi) यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. सुलोचना दीदी यांचे पार्थिव उद्या सकाळी त्यांच्या राहत्या घरी सकाळी 11 वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. शिवाजी पार्क (Shivaji Park)  येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.  


ज्षेष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचे आज निधन झाले. त्या 94 वर्षांच्या होत्या. मुंबईतील दादर येथील सुश्रुषा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्वासोच्छवासाचा त्रास आणि वयोमानानुसार इतर आजारांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारा दरम्यान, सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात मुलगी, नात- नातजावई असा परिवार आहे. सहजसुंदर अभिनय,  आई-वहिणी, बहिणीचे ममत्व, कणखरपणा रुपेरी पडद्यावर त्यांनी आपल्या सशक्त अभिनयाच्या जोरावर जिवंत केला.   


मागील सात दशकांपासून त्या चित्रपटसृष्टीशी संबंधित होत्या. 1946 मध्ये त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. सुलोचना दीदी या 1946 ते 1961 या कालावधीत मराठी चित्रपटसृष्टीतील प्रमुख अभिनेत्री होत्या. मराठी चित्रपटसृष्टीत काम करत असताना त्यांनी हिंदी चित्रपटांतही आपल्या कामाचा ठसा उमटवला. 


अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी आईची भूमिका ताकदीने साकारली.  एक चरित्र अभिनेत्री म्हणून त्यांनी आपली छाप सोडली. देव आनंद, सुनील दत्त, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन आदी सुपरस्टार अभिनेत्यांच्या आईची ऑनस्क्रीन भूमिका साकारली होती. 1946 ते 1961 या काळात सासुरवास (1946), वहिनीच्या बांगड्या (1953), मीठ भाकर, सांगते ऐका (1959), लक्ष्मी आली घरा, मोठी माणसं आदी गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी मुख्य अभिनेत्री म्हणून भूमिका साकारली. सुलोचना दीदी यांनी 250 हून अधिक मराठी-हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. 1943 मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीत सहकलाकार म्हणून पृथ्वीराज कपूर यांच्या बरोबर अभिनयाची सुरुवात करून पुढे राजकपूर, शम्मीकपूर, शशीकपूर या कपूर घराण्याच्या दुसऱ्या पिढीबरोबर आणि नंतर, कपूर घराण्याच्या तिसऱ्या पिढीच्या रणधीर कपूर, ऋषी कपूर, गीता बाली, बबिता, नीतू सिंग यांच्या बरोबरही त्यांनी हिंदी चित्रपटातील काळ गाजवला. 250हून अधिक मराठी तसेच हिंदी चित्रपटांत त्यांनी आपल्या अभियानाची छाप पाडली. वहिनीच्या बांगड्या, मीठ भाकर, धाकटी जाऊ हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत.


सुलोचना दीदी यांनी चित्रपटसृष्टीत दिलेल्या योगदानासाठी 1999 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्याशिवाय,  2004 मध्ये फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. 2009 मध्ये महाराष्ट्र सरकारने 'महाराष्ट्र भूषण' या राज्याच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: