Sulochana Passed Away: प्रतिभाशाली, हरहून्नरी पडद्यावर आई अजरामर केलेल्या ज्षेष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचे आज निधन झाले. त्यांनी वयाच्या 94 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतील एका पर्वाची अखेर झाली आहे. ग्रामीण भागात जन्म घेतलेल्या 'रंगू' पडद्यावर सुलोचना दीदी कशा झाल्या? याचा रंजक इतिहास आहे. सीमाभागातील बेळगावमध्ये 30 जुलै 1928 रोजी जन्म झाला. त्यांचे लहानपणीचे नाव 'रंगू' असे होते. नियतीने दिलेल्या धक्क्यामुळे लहानपणीच रंगूच्या आई वडिलांनी जगाचा निरोप घेतला होता. त्यामुळे मावशीच्या मदतीने कलानगरी कोल्हापुरात दाखल झाल्या. त्यांचा वास्तविक आयुष्यातील प्रवास हा एखाद्या चित्रपटाल शोभेल, असाच आहे. 


‘सुलोचना’ असं नामकरण भालजी पेंढारकरांनी केलं


ग्रामीण भागातून आलेल्या रंगूकडे प्रतिभेची कमी नव्हतीच, त्यामुळे भालजी पेंढारकरांसारख्या महारथीला ही प्रतिभा ओळखण्यास फार वेळ लागला नाही. कोणत्याही कलेची पार्श्वभूमी नसतानाही भालजी पेंढारकरांनी ‘रंगू’ला ‘महारथी कर्ण’ या हिंदी चित्रपटात एका छोट्या भूमिकेत उभं केलं. यानंतर लाजऱ्या रंगूचे ‘सुलोचना’ असं नामकरण भालजी पेंढारकरांनी केलं. त्यानंतर सासुरवास, जयभवानी, मीठभाकर असा यशाचा आलेख चढता राहिला. आणि पाहता पाहता भालजी पेंढारकरांच्या  शिष्याच होऊ गेल्या. 


दिग्गजांचा सहवास लाभला 


धड मराठी येत नसलेल्या सुलोचना यांना मराठी भाषा, संस्कार यांचे शिक्षण मिळत गेलं. भालजी पेंढारकर यांनी त्यांची भाषा सुधारावी म्हणून एक संस्कृत मासिक त्यांच्याकरता लावले. ते वाचणे हे चांगलेच क्लिष्ट काम होते. पण त्याबद्दल तक्रारीचा चकार शब्द न काढता सुलोचनाबाई चिकाटीने त्या भाषादिव्यातून गेल्या. त्यांना ग. दि. माडगूळकर, दत्ता डावजेकर, राजा गोसावी, दामूअण्णा मालवणकर, दिनकर द. पाटील, मीनाक्षी, सुमती गुप्ते अशी मोठी माणसं भेटत यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचल्या. भालजी पेंढारकर यांच्या दिग्दर्शनाच्या तालमीत तयार झालेल्या सुलोचनादीदींची प्रतिमा लाखो चित्रपट रसिकांच्या मनात चित्रपटातील आई अशीच आहे. सोज्वळ, शांत आणि घरंदाज भूमिका त्यांनी पडद्यावर जिवंत केल्या. शेकडो मराठी आणि अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी अशा भूमिका केल्या. शिवाय यांनी अन्य भूमिकाही केल्या आहेत.


सुलोचना दीदी यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात 1946 पासून केली होती. 1946 ते 1961 या काळात सासुरवास (1946), वहिनीच्या बांगड्या (1953), मीठ भाकर, सांगते ऐका (1959), लक्ष्मी आली घरा, मोठी माणसं आदी गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी मुख्य अभिनेत्री म्हणून भूमिका साकारली. सुलोचना दीदी यांनी 250 हून अधिक मराठी-हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. 1943 मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीत सहकलाकार म्हणून पृथ्वीराज कपूर यांच्या बरोबर अभिनयाची सुरुवात करून पुढे राजकपूर, शम्मीकपूर, शशीकपूर या कपूर घराण्याच्या दुसऱ्या पिढीबरोबर आणि नंतर, कपूर घराण्याच्या तिसऱ्या पिढीच्या रणधीर कपूर, ऋषी कपूर, गीता बाली, बबिता, नीतू सिंग यांच्या बरोबरही त्यांनी हिंदी चित्रपटातील काळ गाजवला. 250हून अधिक मराठी तसेच हिंदी चित्रपटांत त्यांनी आपल्या अभियानाची छाप पाडली. वहिनीच्या बांगड्या, मीठ भाकर, धाकटी जाऊ हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या