मुंबई: कोरोना संकटामध्ये समाजातील प्रत्येक स्तरानं पुढाकार घेत एकमेकांना मदतीचा हात दिला. गरजू आणि गरिबांच्या मदतीसाठी सानथोर धावून आले. स्वयंसेवी संस्थांचा यात मोलाचा वाटा दिसून आला. मदतनिधी गोळा करत त्याचा सुयोग्य पद्धतीनं वापर करत या संस्थांनी कोणाच्या डोक्यावर छत दिलं. कुणाला अन्नधान्याचा पुरवठा केला, तर मानसिकदृष्टी खचलेल्यांनाही पाठबळ देण्याचा प्रयत्न केला. 


सर्वसामान्यांपासून कलाकार मंडळीही यात माहे राहिले नाहीत. सध्याही या सेलिब्रिटी मंडळींकडून गरजूंना मदत करण्याचं सत्र सुरुच आहे. नुकतंच अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनंही सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत सर्वांनाच सढळ हस्ते मदत करण्याचं आवाहन केलं आहे. प्राजक्ता ही मदत 'आपलं घर' या संस्थेसाठी मागत आहे. 


दरम्यानच्या काळात ज्या संस्थेनं अनेकांसाठी मदतीचा हात दिला, त्याच संस्थेला आता मदतीची गरज आहे. हीच बाब हेरत प्राजक्तानं स्वत: या संस्थेला मदत केली. शिवाय एका व्हिडीओच्या माध्यमातून तिनं इतरांनाही मदत करण्याचं आवाहन केलं. प्राजक्तानं पोस्ट केलेला हा व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून गेला असून, अनेकांनीच मदतीसाठी पुढाकार घेण्याची तयारीही दाखवली आहे. 






'मी सर्वांना विनंती करते की “आमचं घर” ही एक सामाजिक संस्था आहे, जी ठाण्यात राहणाऱ्या गरीब बांधवांसाठी, मुलांसाठी आणि ज्या वृद्धांना कोणीही आधार नाही त्यांना या संकट काळी मदत करण्याचे काम करत आहे. तरी “आमचं घर” ला त्यांचे हे समाज कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी मदत कराल अशी आशा आहे. मी माझ्यापरीने एक छोटीशी मदत करण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्हांसर्वांना विनंती करते की तुम्ही ही “आमचं घर” ला मदतीचा हात द्या', असं कॅप्शन तिनं या व्हिडीओसोबत लिहिलं आहे.


आदित्य चोप्रा यांच्याकडून बॉलिवूडशी संबंधित लोकांसाठी विनामूल्य लसीकरण मोहीम सुरू


सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कलाकार मंडळींनी या काळात समाज माध्यमांचा वापर इतरांच्या मदतीसाठीही केला किंबहुना यासाठी प्राधान्यही दिलं. प्राजक्ताही त्यापैकीच एक अभिनेत्री ठरत आहे.