मुंबई : अलीकडेच यशराज फिल्म्सचे सर्वेसर्वा आदित्य चोप्रा यांनी बॉलिवूडशी संबंधित 30,000 मजुरी कामगार, तंत्रज्ञ आणि कनिष्ठ कलाकारांना मोफत लसीकरण देण्याची घोषणा केली होती. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्र सरकारला या प्रमाणात डोस देण्याची मागणी केली होती. अशा परिस्थितीत अंधेरी येथील भव्य यशराज स्टुडिओमध्ये आजपासून ही मोहीम सुरू झाली आहे.


आजपासून यशराज स्टुडिओमध्ये सुरू झालेल्या पहिल्या टप्प्यात या उद्योगाशी संबंधित 3500 ते 4000 लोकांना लस देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने, उद्योगातील 30,000 सदस्यांना यशराज फिल्म्सद्वारे लसीकरण केले जाईल.


या मोफत लसीकरण मोहिमेसाठी आदित्य चोप्रा यांनी आपल्या नोंदणीकृत सदस्यांना फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FIWCE) कडून लसी देण्याचे आश्वासन दिले होते. यशराज फिल्म्स आणि एफडब्ल्यूआयसीआय या दोघांनी लसीकरणासाठी डोस देण्यासाठी महाराष्ट्र सरकारला पत्र लिहिले. या पत्रात यशराज स्टुडिओने असे लिहिले होते की लसीकरणासाठी येणाऱ् कर्मचाऱ्यांचा सर्व खर्च ते स्वत: करतील.


Yash Raj Films : यशराज फिल्मकडून बॉलिवूडसंबंधी मजुरांचं मोफत लसीकरण


यशराज फिल्म्ससाठी काम करणाऱ्या आपल्या सर्व लोकांचे आदित्य चोप्रा यांनी पहिल्यांदा कोरोना प्रतिबंधक लसीकरण करुन घेतले आहे, त्यानंतर यशराज स्टुडिओच्या प्रांगणात चित्रपटाच्या शूटिंगशी संबंधीत असलेल्या सर्व लोकांना लसी देण्याची व्यवस्था करण्यात आली. यानंतर, आजपासून प्रॉडक्शन हाऊसच्या वतीने इंडस्ट्रीतील लोकांना लसी देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, जे पुढील अनेक दिवस सुरू राहणार आहे.


यश राज स्टुडिओचे ज्येष्ठ उपाध्यक्ष अक्षय विधानी यावेळी म्हणाले, की “या मोहिमेमुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांना काम करता येईल आणि स्वत: आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक स्थैर्य मिळू शकेल. चित्रपट क्षेत्रात मोठ्या संख्येने लोकं काम करत असल्याने टप्याटप्याने सर्वांचे लसीकरण करण्यात येणार आहे.


मागच्या लॉकडाऊनमध्येही मदत


गेल्या वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊनमध्ये शूटिंग पूर्ण बंद झाल्याने यशराज फिल्म्सने 3000 मजुरांना एकूण दीड कोटींची आर्थिक मदत केली होती. प्रत्येकाच्या खात्यात 5000 रुपये आणि धान्याची मदतही यशराज फिल्म्सने केली होती.