मुंबई : अभिनेता वैभव मांगले याने गेल्या काही महिन्यांपासून चित्रकलेचं व्रत घेतलं आहे. हे आणप सगळे जाणतोच. तो आपल्या सोशल मिडियावर आपण काढलेली चित्रं पोस्ट करत असतो. त्याला त्याच्या चाहत्यांकडून चांगला प्रतिसादही मिळत असतो. त्याच चित्रांना विकून त्यातून जमा झालेल्या रकमेची गरजू रंगकर्मींना मदत करयाची त्याने ठरवली होती. एबीपी माझाने सातत्याने या त्याच्या संकल्पनेला उचलून धरलं. आता ती मदत रंगकर्मींपर्यंत पोहोचली आहे.


वैभवने काढलेल्या चित्राची पहिली मानकरी ठरली होती अभिनेत्री किशोरी गोडबोले. त्यानंतर वैभवची चित्रं घेण्यासाठी अनेकांनी चौकशी केली. वेगवेगळ्या चित्रांच्या वेगवेगळ्या किमती होत्या. गेल्या पंधरा दिवसांत वैभवकडून जवळपास 8 चित्रं कलाप्रेमींनी घेतली आहेत. यातून जमा झाले ते 70 हजार रुपये. ही सर्व रक्कम गरजू रंगकर्मींसाठी आणि रंगमंच कामगारांना देण्यात आली आहे. एबीपी माझाशी बोलताना वैभव म्हणाला, लोकांना माझी चित्रं आवडली. आलेल्या रकमेतून 12 रंगकर्मींना आत्ता मदत केली आहे. माझ्याच ओळखीच्या लोकांकडून माहीती घेऊन गरजू कोण आहे हे लक्षात घेऊन त्यांना मदत करण्यात आली. यात काही रंगकर्मी लॉकडाऊनपासून एका गोडाऊनमध्ये राहातायत. एकाची पत्नी गरोदर आहे, त्याला खर्चासाठी पैसे देण्यात आले. असे अनेक आहेत. पण आता समाधान वाटतं. अजून चित्रं जशी जातील तशी मदत करेनच.'


वैभवने मदत केलेल्या रंगकर्मींची नावं अशी, शिवा कुंभार, सतीश खवतोडे, कमलेश, वैभव शिंदे, राजा पडळीकर, प्रशांत कदम, दीपक परब, मारूती पाडिलकर, विक्रांत दळवी, सुहास चांदुरकर, अमित सुर्वे, भूषण. रंगकर्मींनीही वैभवचे आभार मानले आहेत. वैभवने लॉकडाऊन काळात आपला हात आजमावला. कोकणात गेला असताना सहज हौस म्हणून चित्र काढता काढता तो या कलेच्या, रंगांच्या प्रेमात पडला आणि मग सुरू झाला एकेक चित्रांचा सिलसिला.


आजमितीला वैभवकडे साठेक चित्रं आहेत. यात काही व्यक्तिचित्रं आहेत काही निसर्गचित्र आहेत तर काही स्थलचित्रंही आहेत. आनंद मिळतोय म्हणून वैभवने चित्रं काढायला सुरूवात केली. आता त्यानंतर त्याने त्यातून मदत उभी केल्यानं सर्वच स्तरातून त्याचं कौतुक होतं आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


गरजू रंगकर्मींसाठी धावला कुंचला! अभिनेते वैभव मांगले यांचे स्तुत्य पाऊल


PHOTO | कौन बनेगा करोडपतीचा नवा सेट पाहिलात का?


'करोडपती'वरही कोरोना! इंडियाज बेस्ट डान्सर्सच्या सेटवरही रुग्ण