Dharmaveer :  लोकांचा नेता, जननायक, धर्मवीर अशी ओळख असणारे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. चित्रपट सुरू असताना प्रेक्षक चित्रपटगृहात चक्क टाळ्या आणि शिट्ट्यांचा गजर करत आहेत. शिवसेना पक्षाकडून देखील या चित्रपटाचे अनेक ठिकाणी स्पेशल स्क्रीनिंग करण्यात आले आहे. अनेक कलाकार देखील हा चित्रपट आवर्जून बघत असून, त्यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.


‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) याने देखील थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे. कुशलची पोस्ट वाचून, त्याला हा चित्रपट खूपच आवडल्याचे लक्षात येते. ‘धर्मवीर’ पाहिल्यानंतर कुशल भावूक झाला होता.


पाहा काय म्हणाला कुशल...


‘धर्मवीर’ पाहिल्यानंतर कुशल बद्रिके याने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. यात तो म्हणतो, ‘एखादा नट एखाद्या भूमिकेला ”न्याय” देतो, एखादा ती भूमिका “जगतो” पण एखादी भूमिका “जिवंत” करणारा नट म्हणजे “प्रसाद ओक”. “धर्मवीर” सिनेमा बघून आलो आणि पुन्हा एकदा प्रसाद दादाच्या कामाच्या प्रेमात पडलो, सिनेमा बघताना साक्षात “दिघे साहेबांचा” भास होत राहिला.


दिघे साहेबांच काम एवढं मोठ आहे की आजही त्यांची प्रतिमा ठाणेकरांच्या देवघरात पुजली जाते. आता देवाला दोन तासात मांडता येत नाही येणारही नाही, पण सिनेमा संपताना डोळ्यांच्या कडा पाणावतात. आज इतक्या वर्षानंतरही साहेब तुम्ही आमच्यात जिवंत आहात आणि आजही आम्ही तुमच्या संस्कारात आहोत. आणि कायम राहू. धर्मवीर आनंद दिघे साहेब thank you….!’



बॉक्स ऑफिसवरही धुमाकूळ!


पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 2.5 कोटींची कमाई केली आहे. चित्रपट विश्लेषक तरण आदर्शने ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली होती. प्रविण तरडे यांच्या दमदार लेखन आणि कौशल्यपूर्ण दिग्दर्शनाने सजलेला, झी स्टुडिओज, मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्सची निर्मिती असलेला ‘धर्मवीर मु.पो. ठाणे’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे.


संबंधित बातम्या