Dharmaveer : ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer mukkam post thane) हा सिनेमा प्रदर्शनापूर्वी आणि प्रदर्शनानंतर नव नवे विक्रम करत आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाला चांगला प्रतिसाद देत आहेत. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा सिनेमा पाहायला गेले आहेत. आयनॉक्समध्ये खास मुख्यमंत्र्यांसाठी खास शोचे आयोजन करण्यात आले आहे. पत्नी रश्मी ठाकरे आणि नगरविकासमंत्री तसेच ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेदेखील उपस्थित आहेत. 


याआधी 'धर्मवीर' सिनेमाच्या ट्रेलर लॉंचच्या सोहळ्यात मुख्यमंत्री सहकुटुंब हजर होते. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले होते, 'आनंद दिघे हे 'झुकेंगा नही साला' असे होते. तसेच त्यावेळी त्यांनी आनंद दिघे यांचा एक किस्सादेखील शेअर केला होता,"मी आनंद दिघे साहेबांसोबत एका दौऱ्यावर गेलो होतो. त्यावेळी मी पाहिले होते ते काम करताना तहानभूक विसरुन काम करत असत. प्रत्येक कार्यकर्त्याने त्यांच्या सारखे काम करावे. ते प्रत्येकाला प्रेमाने व आपुलकीने जवळ करत. असा नेता पुन्हा होणे नाही. ज्या वेळी ते गेले त्यावेळी त्यांचे वयं पन्नास होते. मी म्हणेन या पन्नास वर्षांत ते शंभर वर्षांचे आयुष्य जगले. चोवीस तास ते कामाला वाहिलेले होते. त्यांचे राजकीय आणि वैयक्तिक आयुष्य जाणून घेण्यासाठी 'धर्मवीर' जरूर पाहावा".  


लोकांचा नेता, जननायक अशी ओळख असणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा सिनेमा आहे. हा सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 2.5 कोटींची कमाई केली आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. शिवसेनेकडून या सिनेमाचे अनेक ठिकाणी स्पेशल स्क्रीनिंग करण्यात आले आहे. हा सिनेमा आजच्या तरुणाईला धर्मवीर आनंद दिघे यांची खरी ओळख करून देणारा आहे.


400 पेक्षा अधिक स्क्रीन्स आणि 10,000 हून अधिक शोज


400 पेक्षा अधिक स्क्रीन्स आणि 10,000 हून अधिक शोज ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या सिनेमाचे लागले आहेत. विकेंडलादेखील हा सिनेमा चांगली कमाई करतो आहे. सिनेमातील प्रत्येक कलाकाराचं काम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. धर्मवीर पाहून जुन्या शिवसैनिकांना अश्रू अनावर होत आहेत. 


प्रविण तरडे यांच्या दमदार लेखन आणि कौशल्यपूर्ण दिग्दर्शनाने सजलेला, झी स्टुडिओज, मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्सची निर्मिती असलेला ‘धर्मवीर मु.पो. ठाणे’ हा सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमात अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे.