Dharmaveer : ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer mukkam post thane) या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. शुक्रवारी हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून पहिल्याच दिवशी या सिनेमाने 2.5 कोटींची कमाई केली आहे. तरण आदर्शने ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. 


लोकांचा नेता, जननायक अशी ओळख असणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा सिनेमा आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. हा सिनेमा सुरू असताना प्रेक्षक सिनेमागृहात टाळ्या आणि शिट्ट्यांचा आवाज करत असतात. शिवसेनेकडून या सिनेमाचे अनेक ठिकाणी स्पेशल स्क्रीनिंग करण्यात आले आहे. हा सिनेमा आजच्या तरुणाईला धर्मवीर आनंद दिघे यांची खरी ओळख करून देणारा आहे.





धर्मवीर पाहून जुन्या शिवसैनिकांना अश्रू अनावर


ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष असताना त्यांच्या एका इशाऱ्यावर लाखो तरुण काहीही करायला तयार असायचे. आज यातील अनेक तरुण मंडळी शिवसेनेतील अनेक पदांवर आहेत. हा सिनेमा पाहताना या तरुण मंडळींना 80-90 च्या दशकात गेल्यासारखे जाणवले. दरम्यान अनेक शिवसैनिकांना अश्रू अनावर झाले. दिघे साहेबांना प्रत्यक्षात पाहतोय की काय असा भास शिवसैनिकांना झाला. दरम्यान त्यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. 


प्रविण तरडे यांच्या दमदार लेखन आणि कौशल्यपूर्ण दिग्दर्शनाने सजलेला, झी स्टुडिओज, मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्सची निर्मिती असलेला ‘धर्मवीर मु.पो. ठाणे’ हा सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमात अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे.


400 पेक्षा अधिक स्क्रीन्स आणि 10,000 हून अधिक शोज


रिलीजच्या पहिल्याच दिवशी 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' या सिनेमाने विक्रम रचला होता.  400 पेक्षा अधिक स्क्रीन्स आणि 10,000 हून अधिक शोज ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या सिनेमाचे लागले होते. विकेंडलादेखील हा सिनेमा चांगली कमाई करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सिनेमातील प्रत्येक कलाकाराचं काम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 


संबंधित बातम्या


Dharmaveer : 'धर्मवीर'ने रचला विक्रम; 400 पेक्षा अधिक स्क्रीन्स आणि 10,000 हून अधिक शोज


Dharamveer : आनंद दिघेंच्या पोस्टरला दुधाचा अभिषेक, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पार पडला 'धर्मवीर' चा पहिला खास शो