मुंबई : निसर्ग चक्रीवादळाने कोकणचं मोठं नुकसान केलं. मुंबईजवळ अलिबागपर्यंत त्याचे परिणाम जाणवले. यातून अभिनेता देवदत्त नागे आणि त्याचं घरही सुटलं नाही. देवदत्त नागे आपल्याला जय मल्हार या मालिकेतून माहिती आहेच. त्याने रंगवलेला खंडोबा घराघरांत पोचला. सध्या डॉक्टर डॉनची भूमिका रंगवतो आहे. देवदत्त असं त्याचं पूर्ण नाव असलं तरी त्याला सगळेच देवा म्हणूनच संबोधतात. तब्बल तीन दिवसांच्या फोनाफोनीच्या लपंडावानंतर देवा आज एबीपी माझाशी बोलला.

देवदत्त मूळचा अलिबागचा. अनेक कलाकार आपलं घर सोडून मुंबईत स्थायिक होतात तसं देवदत्तनं केलं आहे. चित्रिकरण असताना तो मुंबईत राहतो. पण त्याचं राहतं घर आजही अलिबागमध्येच आहे. चित्रिकरण नसेल किंवा सलग सुट्टी आली की तो थेट अलिबाग गाठतो. तिथे त्याची वाडी आहे. त्यात आंब्याची आणि इतर खूप जुनी झांडं आहे. आणि या झाडांनी वेढलेल्या हिरव्या कुशीत देवदत्तचं घर आहे. हे घरंही विलोभनीय आहे. मोठाल्या खिडक्या. वाऱ्याला आतबाहेर करण्यासाठी आमंत्रण देत असतात. संपूर्णत: निसर्गाच्या कुशीत विसावलेलं देवदत्त नागेचं घर दोन दिवसांपूर्वी अत्यंत प्रसन्न होतं. पण त्या दिवशी मात्र अकल्पित घडलं.

देवदत्त नागे हा अलिबागमध्ये राहतो हे सर्वांनाच माहिती आहे. निसर्ग हे वादळ आल्याची बातमी कळल्यानंतर एबीपी माझाने वारंवार देवदत्तला फोन करण्याचा प्रयत्न केला. पण सगळ्या फोन लाईन्स बंद झाल्या होत्या. नंतर त्याचा फोन बंद येऊ लागला. असे तीन दिवस उलटले. आणि रविवारी सकाळी त्याच्याशी संपर्क झाला. याबद्दल बोलताना तो म्हणाला, 'वादळ येऊन गेल्यानंतर आमच्या परिसरातले लाईट गेले. आत्ता तब्बल तीन दिवसांनंतर लाईट आले आहेत. या काळात मोबाईलला रेंजनही नव्हती. नंतर आली पण, बॅटरी संपत आली होती. मग आधी लॅपटॉपला फोन लावून, नंतर उरल्या सुरल्या बॅटरीज वापरून फोन चार्ज करत होतो. शेवटी घरासमोरच्या गाड्या सुरू करून आम्ही फोन चार्ज केला. फोन चार्ज झाला तरी रेंज नव्हती. इथे दुसऱ्या दिवसापासून युद्धपातळीवर काम सुरू झालं. म्हणून तीन दिवसांनी लाईट आली.'

देवदत्तशी फोनवर बोलतानाही रेजं जात होती. फोन कट होत होता. पण तशातही पुन्हा पुन्हा फोन करून एकमेकांना माहिती देण्याचं काम चालू होतं. देवदत्त माझाशी बोलताना म्हणला, 'सुरूवातीला आम्हाला वाटलं वारं येईल. वादळाची शक्यता होती. त्यामुळे वारं वाढणार याची कल्पना होती. नंतर त्याचा वेग कमालीचा वाढला. झांडं हालू लागली. पानांची फडफट तर धडकी भरवणारी होती. वाऱ्याचा वेग वाढला. तसा पाऊसही. आधी आम्ही ताडपत्री किंवा मिळेल त्याचा आधार घेऊन झाडं वाचवायचा प्रयत्न करू लागलो. पण पाऊस वाढला. वाऱ्याचा वेग तर इतका वाढला की एका पॉईंटनंतर आम्ही सगळे घरी आत सुन्न  बसलो. आता होईल ते होईल हे उमजून चुकलं. नजरेसमोर झाडं तुटली. ती उन्मळून पडली तर पुन्हा लावता येतात. पण अनेक मोठी झाडं तुटली. मधून तुटली. इतकी जुनी वाढलेली मोठी झाडं. या वादळाने तोडली. हे बघत राहण्यापलीकडे पर्याय नव्हता. शेवटी आम्ही गप्प सगळे घरात आलो. लाईट तर नव्हतेच. शेजारच्या झाडाची मोठी फांदी तुटली आणि अगदी शेजारच्या झाडावर पडली. खरंतर ही स्वामी कृपाच म्हणायची. नाहीतर आमच्या घराचंही मोठं नुकसान झालं असतं.'

वाऱ्याचा वेग प्रचंड होताच. झाडं पडत होती. तुटत होती. घराच्या गच्चीवरचे पत्रे उडाले, टाकी तुटली. असं बरंच काही झालंय, देवदत्तच्या घराचं. पण त्याला सल आहे ती झाडं तुटल्याची. तो म्हणतो, 'टाकी, पत्रे हे आणखी काही दिवसांनी आणता येतील. ते लावता येईल. पण इतकी मोठं वर्षानुवर्षं असणारी झाडं तुटली. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं उद्ध्वस्त झालं होतं. आंब्यांचा खच पडला होता झाडावरून. इतकं वाईट वाटलं. हे आंबे लोकांच्या पोटात गेले असेते तर फार बरं वाटलं असतं पण हे सगळं कल्पनेच्या पलिकडचं होतं. ही अवस्था आमच्या परिसरातल्या प्रत्येक घराची अवस्था आहे. आता यातून पुन्हा सावरायचं आहे.'

दूधवाले काका आणि त्यांचे डोळे

देवदत्त आणि परिसरातल्या घरांमध्ये एक दूधवाले काका रोज दूध द्यायला येतात. वादळ गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते आले. त्यांचे डोळे खूप सुजले होते. देवदत्तने त्यांना विचारलं की कशाने सुजलेत डोळे? तर ते म्हणाले, वादळ इतकं भयानक होतं. इतकं नुकसान डोळ्यासमोर झालेलं पाहायचं म्हणजे रडण्याशिवाय काय पर्याय असतो आपल्याकडे. त्यांची ही वाक्य अलिबाग आणि निसर्गाचा फटका बसलेल्यांची मनोवस्था सांगतात.