Abhishek Bachchan Birthday : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आज आपला 48 वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांच्या मुलांनी आपल्या पालकांच्या पालकांच्या पावलावर पाऊल टाकत चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. यातील काही कलाकारांना पालकांसोबत झालेली तुलना भारी पडली.  अभिषेक बच्चनला वडील अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबत झालेली तुलना मारक ठरली. त्यामुळे अभिषेकला बॉलिवूडमध्ये आपलं स्थान गाठता आलं नाही.युवा, गुरू, रावण, मनमर्जियां सारख्या चित्रपटात त्याने साकारलेल्या भूमिकांचे कौतुक झाले होते. 


'रेफ्यूजी' चित्रपटातून पदार्पण 


अभिषेक बच्चनने वर्ष 2000 मध्ये रेफ्यूजी या चित्रपटातून पदार्पण केले. अभिषेकसोबत करीना कपूरनेही या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. जे. पी. दत्ता यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला नाही. अभिषेकच्या वाटेला फारसं कौतुकही आले नाही. करीनाने या चित्रपटातून छाप सोडली. 


चार वर्षात 17 चित्रपट फ्लॉप 


पुढील चार वर्षात 2004 पर्यंत अभिषेक बच्चनची भूमिका असलेले 20 चित्रपट प्रदर्शित झाले. त्यातील 17 चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले. त्यानंतर अभिषेक बच्चनच्या कारर्कीदीत चढ-उतार दिसून आले. त्यानंतर 2004  नंतरच्या चित्रपटांमध्ये अभिषेकने आपली छाप सोडलीय. युवा, धूम, बंटी और बबली, सरकार, ब्लफमास्टर, गुरू, रावण, दोस्ताना, दिल्ली-6 आदी चित्रपटातील अभिषेकच्या कामाचे कौतुक झाले. 


या वर्षात चित्रपटांमध्ये अभिषेकने काम केले. त्यातील काही चित्रपटांतील भूमिकांसाठी त्याचे कौतुक झाले. 


बॉलिवूडमधून अभिनेता म्हणून काहीसा दूर झालेल्या अभिषेकने 2020 मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर काम करण्यास सुरुवात केली.ओटीटी प्लॅटफॉर्मवरील त्याने साकारलेल्या भूमिकांचे कौतुक करण्यात आले. तर, ओटीटीवर रिलीज झालेल्या दसवी या चित्रपटासाठी  पुरस्कारही मिळाला.  


अभिनयासोबतच तो व्यवसायावरही लक्ष केंद्रित करत आहे. त्याने 2014 मध्ये कबड्डी संघ-जयपूर पिंक पँथर्समध्ये गुंतवणूक केली होती, ज्याचे मूल्य सुमारे 100 कोटी रुपये आहे. अभिषेकची एकूण संपत्ती अंदाजे 280 कोटी रुपये आहे.
 


वडिलांसाठी शिक्षण अर्धवट सोडले 


1999 च्या सुमारास अमिताभ बच्चन अत्यंत वाईट टप्प्यातून जात होते आणि दिवाळखोरीत गेले होते. अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड (ABCL) ही त्यांची कंपनी कर्जबाजारी होती. ही एक उत्पादन, वितरण आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी होती. कंपनी कर्जात बुडाल्यानंतर, बिग बींनी अभिषेकला भारतात परत बोलावले. आर्थिक अडचणींमुळे त्यांच्याकडे अभिषेकला तिथे शिक्षण देण्यासाठीही पैसे नव्हते.


खुद्द अभिषेकने एका मुलाखतीत याचा उल्लेख केला होता आणि सांगितले होते की, 'माझ्या वडिलांना त्यांच्या स्टाफकडून पैसे मागावे लागले. अशा स्थितीत मी त्यांच्यासोबत कसा नाही, याची मला आतून छळ होत होती. मी ताबडतोब पप्पांना फोन केला आणि म्हणालो, पप्पा, मला वाटतं की मला कॉलेज सोडावं लागेल आणि फक्त तुमच्याकडे येऊन तुम्हाला कशीतरी मदत करावी लागेल. जेव्हा माझ्या वडिलांना रात्रीचे जेवण मिळेल की नाही हे देखील माहित नसते तेव्हा मी येथे बोस्टनमध्ये बसू शकत नाही.


यानंतर अभिषेक मुंबईत परत आला आणि मेजर साब या चित्रपटाच्या निर्मितीचे काम पाहू लागला. तो सेटवर चहा बनवणे, लाइटिंग पाहणे इत्यादी छोटी कामेही करत असे. याच काळात अभिषेकला चित्रपटांमध्ये रस निर्माण झाला आणि त्याने अभिनेता होण्याचा निर्णय घेतला. पण त्यानंतर बॉलिवूडमध्ये काम मिळवणे अभिषेकसाठी आव्हानात्मक होते.