Kunal Raut News Update : नागपूर जिल्हा परिषदेसमोर (Nagpur Zilla Parishad) भाजपकडून जोरदार आंदोलन (BJP Protest) केले जात आहे. दोन दिवसांपूर्वी काँग्रेस नेते नितीन राऊत (Nitin Raut) यांचे सुपुत्र आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत (Kunal Raut) यांनी जिल्हा परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरला काळे फासून आंदोलन केले होते. याचा निषेध म्हणून नागपूर जिल्हा परिषदेसमोर भाजपकडून जोरदार आंदोलन सुरु आहे.
नागपूर जिल्हा परिषदेसमोर भाजपकडून जोरदार आंदोलन
पंतप्रधानांच्या पोस्टरला काळं फासण्याचं प्रकरण आणि दुसरं म्हणजे काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेत अर्थसंकल्पाच्या पुस्तकावर बँक घोटाळ्यात आरोपी ठरलेल्या सुनील केदार यांचा फोटो असल्याचा प्रकरण तापला होता. जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता आहे, म्हणून अर्थसंकल्पाच्या पुस्तकावर काँग्रेसचे सदस्यांनी सुनील केदार यांचा फोटो छापला होता. तेव्हा एका दोषसिद्ध आरोपीचा फोटो जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पाच्या पुस्तकावर का, भाजप सदस्यांच्या या प्रश्नावर त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली होती.
पंतप्रधान मोदींच्या पोस्टरला फासलं काळं
आज भाजपने या दोन्ही प्रकरणांना उचलून जिल्हा परिषदेच्या समोर जोरदार आंदोलन सुरू केले आहे. नागपूर जिल्हा परिषद म्हणजे काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची दुकान झाली आहे. जिल्हा परिषद बरखास्त करा, अशी मागणी करण्यात येत आहे. जिल्हा परिषद समोर रस्त्यावरील वाहतूक भाजप कार्यकर्त्यांनी रोखून धरत रस्ता रोको आंदोलन केलं. नागपूरच्या जीपीओ चौक आणि उच्च न्यायालयाला जोडणारा हा रस्ता आहे. या रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत एका बाजूची वाहतूक रोखून धरली. जिल्हा परिषदेत प्रचंड भ्रष्टाचार केले जात असून जिल्हा परिषद बरखास्त करण्याची मागणी भाजप नेत्यांनी केली आहे.
कुणाल राऊत यांना काँग्रेस पक्षाकडूनच घरचा आहेर
भारत सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या योजनेच्या पोस्टरवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला काळे फासण्याच्या कृतीला आपले समर्थन नसल्याची भूमिका नागपूर जिल्हा परिषदेतील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. पंतप्रधान मोदींच्या फोटोला काळं फासल्याप्रकरणी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना रविवारी पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे याप्रकरणी कुणाल राऊत यांना पक्षातूनच घरचा आहेर मिळाला आहे.
'ही कृती समर्थनीय नाही'
याबाबत जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष काँग्रेस नेत्या कुंदा राऊत म्हणाल्या शनिवारी जिल्हा परिषद कार्यालय बंद होते. 'पंतप्रधान हे कोणत्याही पक्षाचे नाही ते देशाचे आहेत. त्यामुळे ही कृती समर्थनीय नाही.' असं कुदा राऊत यांनी म्हटलं आहे. याप्रकरणी काही लोक आमच्यावर जे आरोप करत आहे, ते राजकीय पोळी शेकत असल्याचही त्यांनी सांगितले. दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या पोस्टरला काळे फासल्याप्रकरणी भाजपाकडून आज जिल्हा परिषद परिसरात ठिय्या आणि धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :