Abhijeet Bichukale : राज्यातील नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये (Maharashtra Assembly Elections 2024) महायुतीच्या बाजूने बहुमत झुकलं आणि महाविकास आघाडीचा पराभव झाला. त्यानंतर निवडणुकांमध्ये ईव्हीएम घोटाळा झाला असल्याचा दावा वारंवार मविआच्या नेत्यांकडून करण्यात येतोय. त्यामुळे सध्या विधानसभा निवडणुकांचा ऱणसंग्राम संपला असला तरीही आरोपांची खेळी अजूनही सुरुच आहे. विरोधकांनी ईव्हीएमविरोधात लढा उभा केल्याचं चित्र सध्या राज्यात आहे. याच लढ्यात आता बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) यांची एन्ट्री झाली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी जर शरद पवारांनी (Sharad Pawar) ईव्हीएम विरोधात लढा उभा केला तर माझा त्यांना पाठिंबा असल्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे.
अभिजीत बिचुकले हे यंदाची विधानसभा बारामती विधानसभा मतदारसंघातून लढत होते. बारामतीची यंदाची लढाई हा राज्यातील सर्वात लक्षवेधी आणि चुरशीची लढत होती. कारण अजित पवार विरुद्ध त्यांचा सख्खा पुतण्या युगेंद्र पवार अशी ही लढत झाली होती. याच मतदारसंघातून अभिजीत बिचुकले देखल निवडणूक लढवत होते. पण आता निकालानंतर अभिजीत बिचुकले यांनी प्रतिक्रिया देत ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याची शंका व्यक्त केली आहे.
मला 200 मतं तरी पडायला हवी होती - अभिजीत बिचुकले
अभिजीत बिचुकले यांनी म्हटलं की, महाराष्ट्रात मला खूप स्टारडम आहे. मी कुठेही दिसलो तरी शंभर लोकं माझ्या आजूबाजूला फोटो काढण्यासाठी जमा होतात. बारामतीत निवडणुकीवेळी अजित पवार आणि शरद पवार गटातील कार्यकर्ते त्यांच्या त्यांच्या पक्षाचे बॅच आणि उपरणे बाजूला ठेवून माझ्यासोबत फोटो काढत होते. किमान हजार माणसांनी तरी माझ्यासोबत फोटो काढलेत. त्यामुळे मला कमीत कमी 200 मतं तरी पडायला हवी होती. पण ती पडली नाहीत, म्हणजेच ईव्हीएममध्ये घोटाळा आहे. जर शरद पवार ईव्हीएमविरोधात लढा उभारणार असतील तर त्यांच्यासोबत मी असेन...
विरोधकांना शंभर जागा मिळणं तरी अपेक्षित आहे - अभिजीत बिचुकले
शरद पवारांविषयी बोलताना अभिजीत बिचुकले यांनी म्हटलं की, शरद पवारांचे वय पाहता, त्यांचा दारुण पराभव जरी झाला असेल, तरी एवढा दारुण पराभव व्हावा,असं मला बारामतीमधला एक विरोधक म्हणूनही वाटत नाही. त्यांचं कार्य मोठं आहे. ते ज्येष्ठ नेते आहेत. विरोधकांना किमान 100 जागा मिळणं तरी अपेक्षित होतं. पण आता जर शरद पवार 'ईव्हीएम'बाबत बोलत असतील, तर ते गंभीर आहे.