बेळगाव : शहरात सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषकांच्या महामेळाव्याला कर्नाटक पोलिसांनी बंदी घातली आहे. तसेच बेळगाव ज्या पाच ठिकाणी हा महामेळवा पार पडण्याची शक्यता आहे त्या पाचही ठिकाणी जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. याचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. सोमवारपासून बेळगाव शहरातील विधानसौध या ठिकाणी कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. त्याच दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून मराठी भाषकांच्या महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. 


बेळगावात पाच ठिकाणी जमावबंदी 


बेळगाव शहर पोलिस आयुक्तांनी महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळावा घेण्याची शक्यता असलेल्या पाच ठिकाणी जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. तर जमावबंदी आदेश लागू केला असला तरी कोणत्याही परिस्थितीत महामेळावा घेणारच असा निर्धार महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी केला.


बेळगावच्या धर्मवीर संभाजी चौक येथे सोमवारी सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा होणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस खात्याने धास्ती घेऊन शहरातील धर्मवीर संभाजी चौक, छत्रपती संभाजी उद्यान, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, लेले ग्राउंड, व्हॅक्सिन डेपो अशा पाच ठिकाणी जमाव बंदीचा आदेश लागू केला आहे. या ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यावर बंदी घातली आहे. 


माजी आमदार मनोहर किणेकर, समिती नेते आर.एम.चौगुले, शुभम शेळके आणि कार्यकर्त्यांनी व्हॅक्सिन डेपो येथेही भेट देऊन पाहणी केली. जमावबंदी आदेश लागू केलेल्या पाच ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


एकीकरण समितीचे नेते आर.एम.चौगुले यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, "महाराष्ट्रात जाण्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत. महाराष्ट्रात गेल्यावरच हे आंदोलन बंद होईल. यापूर्वी देखील अनेकदा पोलिस खात्याने दबाव तंत्र वापरून आंदोलनाला आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला. पण त्याला मराठी माणसाने दाद दिली नाही. कोणत्याही परिस्थितीत सोमवारी आम्ही महामेळावा करणारच."


महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावमध्ये प्रवेश बंदी


सोमवारी होणाऱ्या मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावमध्ये  प्रवेशबंदी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्याला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र महाराष्ट्र एकीकरण समिती हा महामेळावा घेण्यावर ठाम आहे. त्यामुळे बेळगावात पुन्हा एकदा सीमावाद तापण्याची शक्यता आहे. 


कोल्हापुरातून शिवसैनिक बेळगावला जाणार


महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या या मराठी भाषकांच्या महामेळाव्याला कोल्हापुरातून मोठ्या संख्येने शिवसैनिक बेळगावकडे जाणार आहेत. मात्र नेहमीप्रमाणे या सगळ्यांना कर्नाटक पोलिसांकडून सीमेवरच अडवले जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे या महामेळाव्यासाठी महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेश दिला जाणार नसल्याचे कर्नाटक प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे यावर आता महाराष्ट्रातील नेते काय भूमिका घेतात, हे पाहावे लागले. उद्याच्या बेळगाव्यातील या मेळाव्याला महाराष्ट्रातील नेमके कोणते नेते उपस्थिती लावणार, याकडेही सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. 


ही बातमी वाचा: