Abhijeet Panse :  ठाण्यातील प्रतिष्ठीत भागांमध्ये सर्रास ड्रग्ज विक्री होत असल्याचा आरोप दिग्दर्शक आणि मनसे नेते अभिजीत पानसे (Abhijit Panse) यांनी केला आहे. त्याचप्रमाणे यामध्ये त्यांनी ठाण्यातील काही  प्रतिष्ठीत भागांची देखील नावं घेतली आहेत. अभिजीत पानसे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी याबाबत भाष्य केलं आहे. 


रेगे, रानबाजार, ठाकरे यांसारख्या सिनेमांमधून अभिजीत पानसे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. त्यानंतर त्यांनी राजकारणाचा प्रवास सुरु केला. दरम्यान कोकण पदवीधरसाठी मनसेकडून नुकतीच अभिजीत पानसेंची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर अभिजीत पानसे पुन्हा एकदा सक्रिय झाले असून त्यांनी ड्रग्जसंदर्भात काही गंभीर आरोप केले आहेत. 


अभिजीत पानसेंनी काय म्हटलं?


मी अतिशय जबाबदारीने सांगतोय की ठाण्यात कळवा ब्रिजच्या खाली, आंबेडकर रोडच्या कॉर्नरला, त्यानंतर ब्रम्हांडमध्ये, हिरानंदानी इस्टेटमध्ये, वागळे इस्टेट 16 नंबर मध्ये फोनवरुन हे कॉन्टॅक्ट्स केले जातात. मी कधी पाहिले नाही, पण कधी पांढरे दाणे असतात तर कधी गुलाबी दाणे असतात, ते दाणे कधी अक्षरश: 200 रुपये पाकीट ते 1200 रुपये पाकीट असे विकले जातात. याच्यावर कारवाई करण्यासाठी आपले पोलीस सक्षम आहेतच. 






अभिजीत पानसे कोण?


मनसे नेते अभिजीत पानसे हे प्रसिद्ध सिनेलेखक आणि दिग्दर्शक आहेत. 2014 मध्ये पानसेंनी दिग्दर्शित केलेल्या रेगे चित्रपटाला प्रेक्षकांकडून मोठी दाद मिळाली होती. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आयुष्यावर आधारित ठाकरे सिनेमाची निर्मिती खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्यावेळी बाळासाहेबांचं आयुष्य रुपेरी पडद्यावर साकार करण्यासाठी संजय राऊतांनी अभिजीत पानसेंची निवड केली. अभिजीत पानसे दिग्दर्शित ठाकरे सिनेमा महाराष्ट्रासह देश-विदेशात प्रचंड गाजला. 


शिवसेनेत असताना भारतीय विद्यर्थी सेनेची धुरा अभिजीत पानसे यांच्या खांद्यावर होती. मात्र, नंतर आदित्य ठाकरेंच्या लॉन्चिंगसाठी बाळासाहेबांकडून युवासेना स्थापन करण्यात आली आणि शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेचं विलीनीकरण युवासेनेत झालं. मग नाराज पानसे यांनी मनसेची साथ देण्याचा निर्णय घेतला. अभिजित पानसे सिनेमाव्यतिरिक्त राजकारणातही सक्रिय असतात. पानसे यांनी मनसेच्या चित्रपट सेनेची जबाबदारी सांभाळलेली आहे. राज ठाकरेंच्या निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जातात. अभिजीत पानसे यांनी 2014 मध्ये लोकसभा निवडणूकही लढवली होती. 



ही बातमी वाचा : 


Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस 5' मधून बाहेर पडण्याचा निर्णय का घेतला? अखेर महेश मांजरेकरांनी केला खुलासा, म्हणाले, 'सध्या मनात काही..'