Aai Kuthe Kay Karte : ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर पोहोचली आहे. नुकताच मालिकेत होळीचा सण साजरा झाला. या दरम्यान अरुंधतीच्या घरात चोर शिरला होता. मात्र, हा चोर दुसरा तिसरा कुणी नसून अनिरुद्धच होता. केवळ, अरुंधती आणि आशुतोष एकत्र असतील, या संशयातून अनिरुद्ध तिच्या घरात शिरला होता.
अरुंधती झोपलेली असताना तिला स्वयंपाक घरातून काहीतरी खाली पडल्याचा आवाज येतो. यावेळी अरुंधतीला घरात कोणीतरी शिरल्याची चाहूल लागते. घाबरलेली अरुंधती लगेच यशला फोन करते आणि घरात कुणीतरी शिरल्याचं सांगते. यानंतर यश तिला धीर देत शांत राहायला सांगतो आणि लगेचच तिच्या घरी पोहोचतो. यश दारापाशी आल्यावर अरुंधतीला फोन करून हळूच दरवाजा उघडण्यास सांगतो.
आत आल्यानंतर सोफ्यामागे लपलेल्या चोराची चाहूल त्यालाही लागते. तेव्हा जवळच असलेली एक वस्तू उचलून तो त्या चोरावर हल्ला करणार, इतक्यात तो मारायला उचलेला हात खाली करतो. हा चोर दुसरा तिसरा कुणी नसून, अनिरुद्धच असतो.
संशयातून अनिरुद्ध करणार विकृत कृत्य
इतक्या मध्यरात्री अनिरुद्ध घरात का शिरला, हे जाणून घेण्यासाठी यश त्याच्यावर ओरडतो. यावेळी संतापलेला अनिरुद्ध या कृत्यामागचं खरं कारण सांगतो. अरुंधती आणि आशुतोष एकत्र असतील, या संशयातून अनिरुद्ध आपण तिच्या घरात शिरल्याचं सांगतो. यावेळी अरुंधती त्याला पुढच्या वेळेस असं कृत्य करण्याची हिंमत केल्यास, पोलिसांना कळवण्याची धमकी देते.
देशमुखांसमोर येणार अनिरुद्धचं कृत्य?
हे सगळं प्रकरण घरातल्यांना सांगण्यापासून अनिरुद्ध अरुंधतीला रोखतो. मात्र, तरीही घडला प्रकार अविनाशला कळला आहे. यानंतर हे प्रकरण आता देशमुख कुटुंबासमोर येणार आहे. अनिरुद्धचं विकृत कृत्य घरातल्यांसमोर आल्यानंतर आता देशमुख कुटुंब काय करणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना देखील लागली आहे.
हेही वाचा :
- RRR : सिनेप्रेमींसाठी खुशखबर, एसएस राजामौलींचा 'आरआरआर' सिनेमा 3D मध्ये रिलीज होणार!
- Sher Shivraj, Waghnakh : एकीकडे ‘शिवराज अष्टक’, तर दुसरीकडे ‘शिवप्रताप’! ‘शेर शिवराज’ला टक्कर देणार ‘वाघनखं’
- Ajay Devgn : 'द कश्मीर फाइल्स' चित्रपटाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला अजयनं दिलं उत्तर; म्हणाला...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha