मुंबई: पर्यावरण आणि योगासाठी काम करणाऱ्या सदगुरू जग्गी वासुदेव यांनी आता 'सेव्ह सॉईल अवेअरनेस' अर्थात 'माती वाचवा' अभियानाला सुरुवात केली आहे. त्यासाठी त्यांनी बाईकच्या माध्यमातून ब्रिटन ते भारत या तब्बल 30 हजार किलोमीटरचा प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे. लंडनच्या पार्लमेंट स्केअरमध्ये त्यांच्या या प्रवासाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला असून हा प्रवास तब्बल 100 दिवसांचा असेल.
सदगुरू जग्गी वासुदेव यांच्या 'माती वाचवा' या अभियानासाठीचा हा प्रवास 27 देशांमधून होणार आहे. ब्रिटनमध्ये सुरू झालेला हा प्रवास युरोपियन देश, पश्चिम आशिया आणि भारत असा होणार आहे. या आठवड्यात अॅमस्टरडॅम, बर्लिन आणि पराग्वे या देशांमध्ये सदगुरू जग्गी वासुदेव पोहोचणार आहेत. या प्रवासासाठी सदगुरू बीएमडब्ल्यू K1600 GT या बाईकचा वापर करत आहेत.
माती आणि पाण्याचे संवर्धन आवश्यक
मातीचा होणारा ऱ्हास लक्षात घेता त्याच्या संवर्धनासाठी जागरुकता निर्माण करण्यासाठी सदगुरू जग्गी वासुदेव यांनी ही मोहीम सुरू केली आहे. भारतातच नव्हे तर जगभरात शेतकरी आत्महत्या करत असल्याचं ते म्हणाले. या अभियानाच्या माध्यमातून वाढत्या वाळवंटीकरणावर जागरुकता आणि मातीचा होणारा ऱ्हास थांबवण्याचे प्रयत्न केले जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं. सदगुरुंचे हे अभियान जागतिक अन्न संघटना आणि युनायटेड नेशन्स कन्झर्व्हेशन टू कॉम्बॅट डेजर्टीफिकेशन यांच्या माध्यमातून आहे.
यूएनसीसीडी म्हणजे युनायटेड नेशन्स कन्झर्व्हेशन टू कॉम्बॅट डेजर्टीफिकेशन (UNCCD) ने त्यांच्या एका अहवालात सांगितलं आहे की, 2050 सालापर्यंत जगभरातील 90 टक्के मातीचा ऱ्हास होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम हा अन्न सुरक्षा, पाण्याचा तुटवडा, दुष्काळ, वातावरणातील बदल, स्थलांतर यावर होणार आहे. Save Soil campaign चा उद्देश हा जगभरातील किमान साडेतीन अब्ज किंवा 60 टक्के लोकांमध्ये मातीच्या संवर्धनाविषयी जागरुकता निर्माण करणे हा आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha