Marathi Films in Cannes Festival 2022 : कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा सर्वात मोठा महोत्सव मानला जातो. याच चित्रपटात आता एक नाही दोन नाही तर तब्बल तीन मराठी चित्रपटांनी बाजी मारली आहे. पोटरा’ (Potra), ‘कारखानीसांची वारी’ (Karkhanisanchi Wari) आणि ‘तिचं शहर होणं’ (Ticha Shahar Hona) या तीन मराठी चित्रपटांची कान्स आंतरराष्ट्रीय महोत्सवात सहभागी होण्यासाठी निवड झाली आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी शुक्रवारी (आज) याबाबत घोषणा केली आहे. 


दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा फ्रान्स येथे 17 मे ते 28 मे दरम्यान कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होणार आहे. मराठी चित्रपटांचा आंतरराष्ट्रीय दर्जा वाढविणे, त्यांना आंतरराष्ट्रीय ग्राहक मिळवून देणे, तसेच महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचे महत्त्व वाढविणे या उद्देशाने मराठी चित्रपटांचा सहभाग कान्स फिल्म फेस्टिवल (Cannes International Film Festival) मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात येतो. या महोत्सवात निवड झालेल्या मराठी चित्रपटांचे प्रतिनिधी यामध्ये सहभागी होतात. 


मराठी माणसासाठी तसेच मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बाब म्हणजे तीन मराठी चित्रपट या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिसणार आहेत. एबीपी स्टुटिओची सह-निर्मिती असणारा 'कारखानीसांची वारी' हा सिनेमा 10 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मंगेश जोशी यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. मोहन आगाशे, वंदना गुप्ते, अमेय वाघ, प्रदीप वेलणकर, गीतांजली कुलकर्णी आणि शुभांगी गोखले अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमात आहे. या सिनेमातून एकत्रित कुटुंबाचं भावविश्व उलगडण्यात आलं आहे. इफ्फी, टोकियो फिल्म फेस्टिव्हल सारखे अनेक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल या सिनेमाने गाजवले आहेत. तर, युवा दिग्दर्शक शंकर धोत्रे यांचा 'पोटरा' सिनेमा ग्रामीण महाराष्ट्रातली सामाजिक स्थिती दाखवतो. सोलापूर जिल्ह्यात घडणाऱ्या कथानकात मुलींना केंद्रस्थानी ठेवण्यात आलं आहे. 'पोटरा' म्हणजे ज्वारीचं कणीस, हे कणीस जपायचं असतं. शेतात कणीस डोलायला लागली की त्याची जास्त काळजी घ्यायची असते. हा नियम माणसालाही लागू पडतो. वयात येणाऱ्या मुलीलाही असंच जपायचं असतं हे सांगणारा हा सिनेमा ओपन एन्डेड आहे. अस्सल ग्रामीण भाषेतला सिनेमा आता वेगवेगळ्या आंतराराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखल झाला आहे. 


महाराष्ट्र शासनाकडून तीन मराठी चित्रपटांच्या निवड प्रक्रियेसाठी दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव अंतर्गत अशोक राणे, सतिश जकातदार, किशोरी शहाणे-विज, धीरज मेश्राम, मनोज कदम आदी तज्ञ सदस्यांची परिक्षण समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने 32 चित्रपटांचे परिक्षण करुन एकमताने नटराज एन्टरटेनमेंट निर्मित “पोटरा", नाईन आर्चस पिक्चर कंपनी निर्मित “कारखानीसांची वारी” आणि बीइंग क्रिएटिव्ह पिक्चर्स निर्मित “तिचं शहर होणं" या चित्रपटांची कान्स फिल्म फेस्टिवल (CFF) 2022 मध्ये सहभागी होण्यासाठी केलेली शिफारस शासनाने मान्य केली आहे.


महत्वाच्या बातम्या :