सोलापूर : पाच राज्यातील निवडणुकीनंतर देशातील राजकीय परिस्थिती बदलली का? भारत जोडो यात्रेचे परिणाम आणि 2024 च्या निवडणुकाबद्दल योगेंद्र यादव यांना काय वाटतं?कांद्यावर लावलेली निर्यातबंदी बद्दल त्यांनी मतं व्यक्त केले? सोलापुरात स्वराज इंडियाचे संस्थापक निवडणूक विश्लेषक योगेंद्र यादव यांच्याशी  एबीपी माझाचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी सवाद साधला. पाहूयात त्यांनी नेमकं काय म्हटलं..?


महाराष्ट्रात 'मर्यादाहीनता' 


2024 च्या निवडणुकांच्या दृष्टीने महाराष्ट्र हे एक महत्त्वपूर्ण राज्य आहे, भाजपाला जिथे फटका बसू शकतो अशा राज्यांपैकी एक महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रच्या मतदारांना हे आता निश्चित करायचे की कशा पद्धतीचे राजकारण त्याना हवं आहे. कालपर्यंत पंतप्रधान ज्यांना भ्रष्टाचारी म्हणत होते तेच आज त्यांचे लाडके मंत्री झाले आहेत. मला वाटलं नव्हतं की महाराष्ट्रात एवढी 'मर्यादाहीनता' होईल, महाराष्ट्र सांस्कृतिक दृष्ट्या जिवंत राज्य आहे. त्यामुळे इथले लोकं हे सगळं स्वीकारतील असे मला वाटतं नाही, येणाऱ्या काळात कळेल, असे योगेंद्र यादव म्हणाले.


महाराष्ट्रात भाजपला फटका बसू शकतो - 


तेलंगाणामध्ये हरलेली निवडणूक काँग्रेसने जिंकली तर राजस्थान आणि छत्तीसगड जिंकलेली निवडणूक हरली. निवडणुकीच्या निकालाने काँग्रेसला धक्का जरी बसला असला तरी भाजपसाठी निवडणूक सोपी नाही हे लक्षात आले आहे. बंगाल, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र अशा राज्यामध्ये भाजपला फटका बसू शकतो, असा अंदाज योगेंद्र यादव यांनी व्यक्त केला. 


फक्त भारत जोडो यात्राने निवडणूक जिंकता येत नाही -


भाजप निवडणूक जिंकू शकते आणि हरू देखील शकते, या दोन्ही शक्यता आहेत, पण विरोधी पक्ष नेमके काय करतात हे सगळं त्यावर अवलंबून आहे. केवळ भारत जोडो यात्रेमुळे निवडणुका जिंकलेल्या नाहीत, भारत जोडोमुळे काँग्रेसला  ऊर्जा मिळाली, पण त्यानंतर केलेल्या कामामुळेच निवडणूक जिंकली. भारत जोडे यात्रामुळे लोकांचे नॅरेटिव्ह बदलले, पण केवळ एका यात्रेमुळे निवडणूक जिंकता येत नाही. भारत जोडो 2.0 ची होण्यासाठी चर्चा सुरु आहे, अद्याप घोषणा नाही, ज्या राज्यातून यात्रा गेली नाही तिथे मागणी आहे, असे योगेंद्र यादव म्हणाले.


विकासाच्या मुद्यावर देशातील निवडणुका व्हाव्या


2024 ची निवडणूक देशातील संविधानाचे स्वरूप टिकेल की नाही हे निश्चित करेल. सत्ता परिवर्तन झालं तरच या देशात लोकशाही टिकण्याची आशा काही प्रमाणात जिवंत राहिल. भाजपची इच्छा असलेचं की देशात जातीय वातावरण होवो, विकासाच्या मुद्यावर देशातील निवडणुका व्हाव्या हे भाजपला कधीच वाटणार नाही, असा हल्लाबोल योगेंद्र यादव यांनी केला.


काँग्रेसला सल्ला -


प्रत्येक निवडणुक जिंकणे आणि हरण्याने शिकले पाहिजे, काँग्रेसला जर छत्तीसगड आणि राजस्थान बद्दल धडा घ्यायचा असेल तर  इतर कुठेही जाण्याची गरज नाही.  काँग्रेसने तेलंगणाची निवडणूक पहिली पाहिजे, जमिनीवर राहून जनतेत राहून काम केलं पाहिजे, जनतेचे प्रश्न उपस्थित केले पाहिजेत, सलग काम करत राहिले पाहिजे याशिवाय पर्याय नाही, असा सल्ला योगेंद्र यादव यांनी काँग्रेसला दिला. 


शेतकरी विरोधी सरकार - 


तीन वर्षांपूर्वी सर्व कृषी अर्थशास्त्री आणि सरकारी दरबारी लोकं 'कृषी मुक्त' करण्याची भाषा करत होते, मार्केट संपवून शेतकऱ्यांना कुठेही माल विकता येईल असे सांगितले. मी त्याचं वेळी सांगितले होते की हे सगळं खोटं आहे, हे सगळं शेतकऱ्यांना लुटण्यासाठी आहे. आज शेतकऱ्यांना चार पैसे मिळतील असे वाटतं तेव्हा लगेच सरकार निर्यातबंदी करून टाकलं जातं. कांदा 80 रुपये झाला की लगेचच कॅबिनेट मिटिंग घेतल्या जातात पण तोच कांदा एक रुपयाने गेला तर कोणीही बैठक घेतं नाही. कांद्यावर लावलेली निर्यातबंदी ही देशाची सत्ता ही कशी शेतकरी विरोधी आहे हेच दाखवून देतेय, असे योगेंद्र यादव म्हणाले.