मुंबई : जानेवारी महिन्यात कोस्टल रोडचा पहिला टप्पा सुरु होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. ते सीएसआर एक्सलन्स अवॉर्डस् प्रदान सोहळ्यात बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, पुढच्या महिन्यात मरीन ड्राईव्ह ते वरळी दरम्यान कोस्टल रोडचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. कोस्टल रोड सुरु झाल्यामुळे मुंबईकरांचा वेळ वाचणार आहे. 


महाराष्ट्र ग्रोथ इंजिन आहे, सगळ्यात जास्त इन्फ्रा प्रोजेक्ट आजच्या काळात महाराष्ट्रात आहेत. पूर्वीच्या काळात सगळं बंद करण्यात आलं होतं, आमचं सरकार आल्यावर सगळे प्रकल्प सुरू झाले. कोस्टल हायवे जानेवारीच्या अखेरपर्यंत सुरु होणार आहे. मरीन ड्राईव्ह ते वरळी दरम्यान सुरु होणार आहे. त्यानंतर पुढच्या वर्षी पुढील टप्पा सुरु होईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले. 


शिवडी ते नाव्हा हा 22 किमीचा MTHL हा रस्ताही पुढील महिन्यात सुरु होईल. दोन तासांचा रस्ता फक्त 15 मिनिटांत पार होणार आहे. यामुळे मुंबईकरांचा वेळ वाचणार आहे, असेही शिंदे म्हणाले. 


CSR जर्नल एक्सलेन्स पुरस्कार वितरण सोहळा, दिग्गजांचा सन्मान -


दि सीएसआर जर्नलच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचा CSR जर्नल एक्सलेन्स पुरस्कार वितरण सोहळा 2023 मुंबई स्टॉक एक्सचेंज येथे आज पार पडला. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना ही पुरस्कार प्रदान करण्यात आला.  सुधीर मुनगंटीवार यांना ‘दि सीएसआर जर्नल चॅम्पीयन ऑफ गुड गव्हर्नन्स’ हा पुरस्कार सर्वोत्तम प्रशासन व्यवस्था निर्माण करण्यात यशस्वी ठरल्याबद्दल दिला.  


सुधीर मुनगंटीवार यांना राजनाथ सिंह आणि एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. खासदार श्रीकांत शिंदे यांना सी एस आर जर्नल पुरस्कार देण्यात आला. श्रीकांत शिंदे उपस्थित नसल्याने एकनाथ शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. युवराज सिंग(युवराज च्या आईने पुरस्कार स्वीकारला) ,भूमी पेडणेकर यांना ही पुरस्कार देण्यात आला. सामाजिक कार्याबद्दल पद्मश्री डॉक्टर रवींद्र कोल्हे आणि डॉक्टर स्मिता कोल्हे यांना पुरस्कार देण्यात आला. 



श्रीकांत शिंदेंचं कौतुक - 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितीत सर्व दिग्गजांचे कौतुक केले. ते म्हणाले की, डॉ. श्रीकांत यांचंही कौतुक करावं लागेल. कल्याणमधून तो लढला, तेव्हा त्याची एवढीच ओळख होती श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदेंचा मुलगा आहे. आता आजच्या काळात त्याची स्वतःची वेगळी ओळख आहे. मला पिता म्हणून अभिमान आहे त्याचा.प्रत्येक बापाला तो असतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.