Kolhapur Uttar Vidhan Sabha : कोल्हापुरात उत्तरच्या राजकारणामध्ये अभूतपूर्व कलाटणी आठ दिवसात दोनदा मिळाली. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेचा सर्वाधिक तापलेला आणि सर्वाधिक उत्कंठा लागून राहिलेला मतदारसंघ म्हणजे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघातून उमेदवारी कोणाला मिळणार? इथंपासून सुरू झालेल्या प्रवास ते दोनदा उमेदवार देऊनही काँग्रेसकडे अधिकृत उमेदवार नाही आणि शेवटी ज्याची उमेदवारी रद्द केली त्यालाच पाठिंबा देण्याची वेळ अशी स्थिती काँग्रेसची कोल्हापूर उत्तरला झाली आहे. 


कार्यालयावर दगडफेकीपासून घटनाक्रमाला सुरुवात 


या मतदारसंघांमध्ये महायुतीने महाविकास आघाडी या दोन्ही ठिकाणी उमेदवारीवरून वाद रंगला होता. महायुतीमधून पहिल्यांदा राजेश क्षीरसागर यांची उमेदवारी निश्चित मानली जात असताना त्यांना सुद्धा शिंदे गटाच्या पहिल्या यादीमध्ये स्थान मिळालं नव्हतं. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर ते मुंबई गाठीभेटी करत आपली उमेदवारी निश्चित केली. दुसरीकडे काँग्रेसकडून राजेश लाटकर सारख्या सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र, राजेश लाटकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये काँग्रेसमध्ये असंतोष उफाळून आला. उमेदवारी जाहीर झाली त्याच रात्री काँग्रेस कमिटी कार्यालयावर हल्ला करण्यात आला. दगडफेक करून काळं फासण्याचा सुद्धा प्रयत्न झाला आणि चव्हाण पॅटर्न असा उल्लेख करण्यात आला. त्यानंतर काँग्रेसच्या 26 माजी नगरसेवकांनी हा लादलेला उमेदवार म्हणत राजेश लाटकर यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केला आणि आमदार सतेज पाटील यांना पत्र लिहिले. या पत्रावर माजी 26 नगरसेवकांच्या सह्या होत्या. यामध्ये व सतेज पाटील यांचे खंदे समर्थक शारगंधर देशमुख, सचिन चव्हाण यांच्यासह माजी नगरसेवकांचा सुद्धा समावेश होता. 



राजेश लाटकरांची बंडखोरी, काँग्रेसमध्ये टेन्शन


त्याच दिवशी कोल्हापूरपासून ते पार दिल्लीपर्यंत पुन्हा एकदा राजकीय घडामोडी घडल्या आणि राजेश लाटकर यांच्या उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय झाला आणि ऐनवेळी मधुरिमाराजे छत्रपती यांची उशिरा उमेदवारीची घोषणा करण्यात आली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या शक्तीप्रदर्शनाने कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण आणि करवीर या तीन मतदारसंघातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्यामुळे कोल्हापूर उत्तरच्या उमेदवारीचा वाद मिटला असं दिसून येत होतं. मात्र, राजेश लाटकर यांनी उमेदवारी जाहीर झालेली नाकारल्याने बंडाचा झेंडा फडकावला. त्यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केला आणि कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर उत्तरची निवडणूक लढवणार अशी भूमिका घेतली. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून राजेश लाटकर यांची मनधरणी सुरू होती. मात्र, राजेश लाटकर यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. आज (4 नोव्हेंबर) उमेदवारी माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सुद्धा राजेश लाटकर यांच्या घरी सतेज पाटील जाऊन पोहोचले. मात्र राजेश लाटकर त्यापूर्वीच घरातून निघून गेले होते आणि ती नाॅटरिचेबल असल्याने ते अर्ज माघार घेण्याच्या मनस्थितीत नसल्याचे स्पष्ट झालं. 



समजून घालूनही राजेश लाटकरांचा बंडाचा पवित्रा


दुसरीकडे रविवारी सुद्धा छत्रपती कुटुंबाकडून राजेश लाटकर यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. शाहू महाराज छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे, मधुरिमाराजे आदींनी जाऊन राजेश लाटकर यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, षड्यंत्र रचून माझी उमेदवारी रद्द करण्यात आली, असा आरोप राजेश लाटकर यांनी केला. आज दिवसभर राजेश लाटकर यांची उमेदवारी माघार घेतली जाईल अशी चर्चा असतानाच थेट दुपारी अर्ज माघारीवेळी पंधरा मिनिटे अभूतपूर्व असा घटनाक्रम कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घडला. छत्रपती कुटुबांचं आगमन झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात धावपळ सुर झाली. राजेश लाटकर यांची उमेदवारी माघार घेतली जाणार ही चर्चा होते त्याच ठिकाणी मधुरिमाराजे यांनीच अर्ज माघार घेतल्याची बातमी धडकली आणि कोल्हापूरच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला. त्यामुळे दोन उमेदवार जाहीर करून सुद्धा काँग्रेसचा उमेदवारच मतदारसंघामध्ये नाही अशी अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली.



सतेज पाटलांचा राग अनावर 


गेल्या काही दिवसांपासून स्वकीयांचा घटनाक्रम घटनाक्रम पाहिल्यानंतर सतेज पाटील यांचा सुद्धा संताप अनावर झाला. त्यांनी थेट आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. जागावाटपात ज्या पाटलांनी कोल्हापूरच्या जागावाटपामध्ये 10 पैकी पाच जागा काँग्रेससाठी खेचून आणल्या होत्या आणि त्यांच्या विजयाची सुद्धा जबाबदारी घेतली होती त्याच पाटलांचा स्वकीयांनीच पाय ओढल्याचे दिसून आले.  


मधुरिमाराजेंचा पहिल्यांदा नकार, मग एन्ट्री अन् आता तडकाफडकी माघार


विशेष म्हणजे कोल्हापूर उत्तरमध्ये सतेज पाटील यांच्या सुद्धा नावाची चर्चा सुरू होती. मात्र कार्यकर्त्यालाच पसंती दिली जाईल असे स्वतः त्यांनी काही दिवसांपूर्वी जाहीरपणे सांगितले होते. त्यामुळे राजेश लाटकरसारख्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली. मात्र, कार्यकर्त्यांनाच कार्यकर्ता नको झाला आहे का? अशी सुद्धा स्थिती राजेश लाटकरांना झालेल्या विरोधाने लक्षात आलं. दुसरीकडे, छत्रपती घराण्यामध्येही दोन महिन्यांपूर्वी उमेदवारी संदर्भात विचारण्यात करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी नकार दिला होता. मात्र, राजेश लाटकर यांच्या उमेदवाराला विरोध झाल्यानंतर लढण्यासाठी पुन्हा होकार दिला आणि आता थेट अर्जच माघार घेतला. कोल्हापूर उत्तरच्या पडद्यामागील घटनांची चर्चा अजूनही होत असताना छत्रपती घराण्याच्या भूमिकेमुळेही आता सतेज पाटील यांचा पाय अडखळल्याचे दिसून येत आहे. 



जाधवांच्या घरात दोनदा उमेदवारी दिली, पण जयश्री जाधव शिंदे गटात


हा घटनाक्रम सुरू असतानाच विद्यमान काँग्रेस आमदार जयश्री जाधव यांनी सुद्धा सतेज पाटील यांच्याशी कोणतीही चर्चा न करताच थेट शिंदे गटांमध्ये मुंबईत जाऊन पक्षप्रवेश केला. हा सुद्धा सतेज पाटील यांना धक्काहोता त्याचं कारण 2019 मध्ये सतेज पाटील यांनी आपली स्वतःची यंत्रणा वापरून चंद्रकांत जाधव यांच्यासारख्या उद्योजकाला आमदारकीची संधी दिली. मात्र दुर्दैवाने 2022 मध्ये चंद्रकांत जाधव यांचे निधन झालं आणि ती जागा रिक्त झाली. त्यानंतर कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीमध्ये 2022 मध्ये चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली. ही निवडणूक भाजपने अत्यंत प्रतिष्ठेची करताना राज्य पातळीवरील सर्व नेते कोल्हापुरात आणले. साम, दाम, दंड, भेद वापरत ही जागा कोणत्याही परिस्थितीत भाजप स्वत:कडे खेचण्यासाठी भाजपने यंत्रणा लावली होती. मात्र या यंत्रणेला भेदून सतेज पाटील यांनी जागा काँग्रेसकडे खेचली होती व जयश्री जाधव आमदार झाल्या. त्याच आमदार जयश्री जाधव यांनी 2024 मध्ये मात्र उमेदवारी नाकारण्यात आल्याने आणि मधुरिमाराजे यांच्या उमेदवारीला विरोधत थेट शिंदे गटामध्ये प्रवेश केला. ज्यांच्यासाठी जीवाचं रान केलं त्यांनी किमान बोलायला हवं होतं, अशी खंत सतेज पाटील यांनी बोलून दाखवली. त्यामुळे दोनवेळा तोंडावर पडायची वेळ आल्यानंतर त्याचाच परिपाक आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सतेज पाटलांच्या रागात दिसून आला. 


लाटकरांची उमेदवारी एकतर्फी झाली का?


राजेश लाटकर यांच्या उमेदवारीमागे सतेज पाटालांचे लोकसभा निवडणुकीतून आलेल्या अनुभवावर बेरजेचं गणित होतं हे दिसून येत होतं. कदमवाडी, सदर बाजार भागातून राजेश लाटकर यांची व्होट बँक आहे. त्यांनी शाहू महाराज यांना मताधिक्य दिले होते. त्यामुळे उमेदवारीसाठी हा त्यांच्यासाठी प्लस पाँईंट ठरला. कोल्हापूर उत्तरमध्ये पेठा आणि बावड्याचा भाग निर्णायक आहे. मात्र, लाटकरांची उमेदवारी निश्चित करताना ज्या माजी नगरसवेकांच्या उमेदवारीने बॅकफूटवर जावं लागलं त्यांच्याशी सतेज पाटील यांनी विश्वासात घेतलं नव्हतं का? किंवा गृहित धरून उमेदवारी देण्यात आली, असाही प्रश्न उपस्थित होतो. जयश्री जाधव यांचा शिंदे गटात प्रवेश, लाटकरांनी माघारीसाठी तंगवल्याने आणि पेठांमधील गणिताचा विचार करून छत्रपती घराण्याने धोका न पत्करण्याचा निर्णय घेतला का? असाही प्रश्न उपस्थित होतो. 


इतर महत्वाच्या बातम्या