रायबरेली (उत्तर प्रदेश) : लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात न उतरण्याचा निर्णय घेणाऱ्या काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी निर्णयाचा फेरविचार करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण वाराणसीतून निवडणूक का नको लढवू? असा सवाल प्रियांका गांधींनी कार्यकर्त्यांना केला.
प्रियांका गांधी वाराणसीतून लोकसभेच्या रिंगणात उतरल्या, तर ती यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील सर्वात हायव्होल्टेज लढत ठरेल. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत प्रियांकांची थेट टक्कर होईल.
प्रियांका गांधी रायबरेलीत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भेटीला आल्या होत्या. आपल्या मातोश्री, अर्थात काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी प्रत्यक्ष भेटीला येऊ न शकल्यामुळे चिंतेत होत्या, असं प्रियांकांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. त्यावर, रायबरेली मतदारसंघातून तुम्हीच निवडणूक लढवावी, अशी गळ कार्यकर्त्यांनी प्रियांका गांधींना घातली.
त्यावर 'वाराणसीतून निवडणूक का नको लढवू?' असा प्रतिप्रश्न प्रियांकांनी हसत विचारला. रायबरेली मतदारसंघातील कामाकडे आपण लक्ष देऊ, अशी हमी सोनिया गांधींना दिल्याचंही प्रियांका यांनी सांगितलं. पक्षाची इच्छा असल्यास निवडणूक लढवण्यास तयार असल्याचं प्रियांका गांधी यांनी एक दिवस आधीच सांगितलं होतं.
प्रियांका गांधींनी राजकारणात उडी घेतली, तेव्हापासूनच त्या रायबरेलीतून निवडणूक लढवण्याच्या शक्यता वर्तवल्या जात होत्या. मात्र प्रियांकांनी त्याबाबत सकारात्मकता दाखवली नव्हती. अखेर काँग्रेसच्या पहिल्या उमेदवार यादीत गांधी मायलेकाचं नाव आल्यावर प्रियांका रायबरेलीतून निवडणूक लढवण्याची शक्यता मावळली.
उत्तर प्रदेशमध्ये 11 एप्रिल ते 19 मे अशा सातही टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. 23 मे रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होतील.
वाराणसीतून निवडणूक का नको लढवू? प्रियांका गांधींचा कार्यकर्त्यांना सवाल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Mar 2019 10:48 AM (IST)
प्रत्यक्ष रायबरेलीत कार्यकर्त्यांच्या भेटीला येऊ न शकल्यामुळे सोनिया गांधी चिंतेत होत्या, असं प्रियांकांनी सांगितलं. त्यावर, रायबरेली मतदारसंघातून तुम्हीच निवडणूक लढवावी, अशी गळ कार्यकर्त्यांनी प्रियांका गांधींना घातली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -