नंदुरबार : नंदुरबारमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावित काँग्रेसला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत. मुलाला लोकसभेचं तिकीट न दिल्यामुळे गावितांनी आपली नाराजी 'एबीपी माझा'शी बोलताना व्यक्त केली.


माणिकराव गावित यांनी काँग्रेसमधून बाहेर पडणार असल्याचं सांगितलं. पुत्र भरत गावित यांना उमेदवारी नाकारल्याने माणिकराव नाराज आहेत. भरत गावित चार वेळा जिल्हा परिषदेवर निवडून आले, त्यांनी अडीच वर्ष जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद भूषवलं, त्यामुळे तरुणांनाही त्यांच्याकडून अपेक्षा होत्या, मात्र इतकी वर्ष काम करुन आपल्या मुलाला तिकीट न दिल्याने नाराज झाल्याचं गावित म्हणाले.

30 तारखेला होणाऱ्या मेळाव्यात अपक्ष उभं राहायचं की भाजपला पाठिंबा द्यायचा, यावर निर्णय घेणार असल्याचं माणिकराव गावित यांनी सांगितलं. 'एबीपी माझा'शी बोलताना माणिकरावांनी आपली खंत बोलून दाखवली.

VIDEO | नंदुरबारच्या माणिकराव गावितांचा काँग्रेसला रामराम?



नंदुरबारमध्ये भाजपने विद्यमान खासदार हीना गावित यांना पुन्हा संधी दिली आहे, तर काँग्रेसने त्यांच्याविरोधात के. सी. पाडवी यांना रिंगणात उतरवलं आहे. मुलाला तिकीट देण्याची इच्छा पूर्ण न झाल्यामुळे माणिकराव बंडाच्या तयारीत आहेत. उत्तर महाराष्ट्रातील बडं प्रस्थ असलेल्या माणिकराव गावितांच्या बंडाळीचा मोठा फटका काँग्रेसला बसू शकतो.

निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात वर्चस्व असलेली मोठमोठी घराणी आघाडीची साथ सोडत सत्ताधारी भाजपच्या गोटात सामील होत आहेत. त्यातच आता माणिकरावांनीही पक्षाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे, वसंतदादा पाटील यांचे नातू प्रतीक पाटील, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपचा झेंडा हाती धरला आहे. तर राष्ट्रवादीचे रणजितसिंह मोहिते पाटीलही राष्ट्रवादीला सोडून भाजपमध्ये सामील झाले आहेत.