आज गुजरातमधील गांधीनगर येथे काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर गांधीनगरध्येच आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलताना प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खूप मोठी आश्वासने दिली होती. त्यापैकी दोन कोटी रोजगार आणि महिला सुरक्षेचे काय झाले? असा प्रश्न आपण मोदींना विचारला पाहिजे. तसेच आपण मतदारांनी बिनधास्त बोलून, सरकारला प्रश्न विचारायला हवेत," असे आवाहनही त्यांनी केले.
"पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांनी देशभरात भावनिक मुद्द्यांवर राजकारण करण्यापेक्षा देशाच्या विकासावर चर्चा करावी," असे आव्हान काँग्रेसच्या नवनियुक्त सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केले आहे.
प्रियांका म्हणाल्या की, "हा देश महात्मा गांधी यांच्या विचारांनी ओळखला जातो. परंतु आज या देशात जे काही घडत आहे ते अत्यंत वाईट आहे." दरम्यान प्रियांका यांनी जनतेला आवाहन केले आहे की, "तुमचं एक मत तुम्हाला आणि देशाला मजबूत करणार आहे, त्यामुळे मतदान करा. त्याबरोबर विकासाच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांना प्रश्नदेखील विचारा"