नागपूर : भाजपमधून काँग्रेसमध्ये परतलेले नाना पटोले यांची नागपुरातून उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता आहे. कारण नाना पटोले यांना उमेदवारी देऊ नका, अशी मागणी नागपुरातील अनेक अनुसूचित जातीमधील काही बुद्धीवंत, कार्यकर्ते आणि संघटनांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना ई-मेलद्वारे केली आहे.


खैरलांजी हत्याकांडानंतर नाना पटोले यांनी घेतलेली पक्षपाती आणि जातीय भूमिका, तसंच आरोपींच्या बचावासाठी केलेले प्रयत्न, आम्ही विसरु शकत नाही. त्यामुळे त्यांची नागपुरातील उमेदवारी या समाजाला दुखावणारी ठरेल, असा दावा त्यांनी ई-मेलमध्ये केला आहे.

नागपूर आरएसएसचे मुख्यालय असूनही इथला सामाजिक सलोखा आजवर कायम राहिला आहे. अनुसूचित जाती आणि कुणबी समाजात कधीही तेढ निर्माण झालेला नाही. मात्र, नाना पटोले यांना उमेदवारी दिल्यास सामाजिक सलोखा धोक्यात येईल, अशी शक्यता या ई-मेलमध्ये वर्तवण्यात आली आहे.

त्यामुळे काँग्रेसने उमेदवार बदलावा, नाहीतर काँग्रेसला मतदान होणार नाही, अशी शंका ई-मेलमध्ये व्यक्त केली आहे.

दरम्यान नानाविरोधी मोहिमेच्या मागे काँग्रेसचे अंतर्गत राजकारणही कारणीभूत आहे का याचा शोधही काँग्रेसश्रेष्ठींना घ्यावा लागणार आहे.