बीड : बीडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे मेहुणे राजेश देशमुख यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला.

राजेश देशमुख हे काँग्रेसचे माजी जिल्हा सरचिटणीस आणि वैद्यनाथ देवल कमिटीचे सचिव आहेत. देशमुख यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजप मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत आज भाजपमध्ये प्रवेश केला.

भाजपचा झेंडा हाती घेताच राजेश देशमुख यांची भाजप महाराष्ट्र प्रदेश चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विलासराव देशमुखांचे नातेवाईक असल्यामुळे राजेश देशमुखांच्या भाजपप्रवेशाला विशेष महत्त्व आहे.

बीडमधून भाजपने विद्यमान खासदार आणि दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या डॉ. प्रीतम मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. आघाडीकडून बजरंग सोनावणे राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढत आहेत.