विक्रोळी विधानसभेतून शिवसेनेचे सुनील राऊत विद्यमान आमदार आहेत. सुनील राऊत शिवसेना नेते संजय राऊत यांचे धाकटे बंधू आहेत. विक्रोळी विधानसभा 2004 आणि 2009 वगळता शिवसेनेचा गड राहिला आहे.
विक्रोळी विधानसभेची राजकीय पार्श्वभूमी
विक्रोळी विधानसभेवर भगवा फडकला तो 1990 साली. याचं श्रेय जातं ते लीलाधर डाके यांना. लीलाधर डाके सलग 3 वेळा विक्रोळी विधानसभेतून आमदार म्हणून विधानसभेवर गेले. 1990 ला लीलाधर डाके हे काँग्रेसचे दिना मामा पाटील यांचा पराभव करत पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. 1995 ला दिना मामा पाटील यांची पत्नी मनोरमा दिना पाटील यांचा पराभव करत दुसऱ्यांदा विक्रोळी वर भगवा फडकवला. 1998 ला काँगेस मधून शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडत स्वतःचा पक्ष काढला तो राष्ट्रवादी काँग्रेस. राष्ट्रवादी काँग्रेस मधून 1999 ला दिना पाटील यांचे सुपुत्र संजय पाटील हे लीलाधर डाके यांच्या विरुद्ध विक्रोळी विधानसभेतून आव्हान देण्याचे प्रयत्न केला पण संजय पाटील यांना सुद्धा पराभवाला समोर जावं लागलं.
लीलाधर डाके यांनी पाटील घराण्याला कधीच विक्रोळीत वरचढ होऊ दिले नाही. पिता, पत्नी, पुत्र तिघांचा पराभव करत विक्रोळी हा गड शिवसेनेकडेच राखून ठेवला. चित्र बदलले ते 2004 ला. 2004 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये संजय दीना पाटील यांनी लीलाधर डाके यांचा 5600 मतांनी पराभव करत फक्त शिवसेनेच्या गडाला खिंडारच नाही पाडली तर पाटील घराण्याच्या पराभवाचा बदला ही घेतला. 2008 राजन ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडले आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची स्थापना केली. 2009 ला विक्रोळीतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मंगेश सांगळे यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्यांनी संजय दिना पाटील यांच्या पत्नी पल्लवी पाटील यांचा पराभव करत मनसेच्या इंजिनाची विक्रोळीत एन्ट्री केली. 2014 ला सुनील राऊत यांनी मंगेश सांगळे यांचा 25 हजार मतांनी पराभव करत पुन्हा विक्रोळीत भगवा फडकवला.
भौगोलिक दृष्ट्या कसं आहे विक्रोळी
विक्रोळी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात इमारती आणि चाळीने व्यापलेला भाग आहे. यामध्ये मराठी वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. 1984 ते 2009 पर्यंत एकूण आठ वार्ड विक्रोळी विधानसभेत येत होते. कामराज नगर, रमाबाई नगर, गोदरेज गाव, कन्नमवार नगर, टागोर नगर, हरियाली व्हिलेज, कांजूर ईस्ट, भांडुप ईस्ट असे हे आठ वार्ड होते. 2009 नंतर विक्रोळी ही सहा वार्ड पर्यंत सीमित झाली. भांडूप ईस्ट, कांजूर ईस्ट, कन्नमवार नगर, टागोर नगर, हरियाली व्हिलेज, सूर्या नगर या भागांचा समावेश आहे. या सहा वार्डमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एक नगरसेवक, भाजपा दोन, नगरसेवक आणि शिवसेना तीन नगरसेवक आहेत.
मतदार विभागणी
विक्रोळी विधानसभेत एकूण 2,27,000 मतदार आहेत. या मध्ये पुरुष मतदार 53 टक्के आहेत तर स्त्री मतदारांची टक्केवारी 47 टक्के आहे.
विक्रोळीतील समस्या
कन्नमवार नगरचा मोठा भाग सीआरझेड मध्ये येतो ज्यामुळे तिथले विकास होण्यास अडचणी येत आहेत. पुनर्विकास संदर्भातले म्हाडाचे धोरण अमलात आणण्यास विलंब. 1985 ला कामगार कल्याण येथे विक्रोळीकरांसाठी स्विमिंग पुलचे नारळ फोडण्यात आले पण अद्याप ही कामाला सुरुवात सुद्धा झाली नाही. टागोरनगर मधील 2966 घरांना अजून सुद्धा पाण्याच्या समस्याला सामोरे जावं लागत आहे.
हे असतील संभाव्य उमेदवार
शिवसेनेकडून सुनील राऊत यांच्या नावाची चर्चा आहे तर भाजपकडून मंगेश सांगळेसुद्धा विक्रोळीतून प्रयत्नशील आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस कडून दादा पिसाळ यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे तर मनसेकडून विनोद शिंदे इच्छुक आहेत.
सध्याची राजकीय परिस्थिती
शिवसेनेकडून सुनील राऊत तर भाजपाकडून मंगेश सांगळे दोघेही आपआपल्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. ज्यामुळे मराठी मतं विभागण्याची शक्यता आहे. ज्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला होण्याची शक्यता आहे. मतांच्या विभागणीमुळे विक्रोळी विधानसभेतून या वेळेस राजकीय स्थिती बदलण्याची चिन्ह दिसत आहेत. त्यामुळे विक्रोळी विधानसभेची लढाई एकहाती नसेल एवढं मात्र निश्चित.
#लेखाजोखाविधानसभामतदारसंघांचा
#विक्रोळी ग्रामीणविधानसभामतदारसंघ
विक्रोळी विधानसभा मतदारसंघ | मतांच्या विभागणीमुळे राजकीय स्थिती बदलण्याची चिन्ह
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Sep 2019 11:16 PM (IST)
मतांच्या विभागणीमुळे विक्रोळी विधानसभेतून या वेळेस राजकीय स्थिती बदलण्याची चिन्ह दिसत आहेत. त्यामुळे विक्रोळी विधानसभेची लढाई एकहाती नसेल एवढं मात्र निश्चित.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -