आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे पालघर जिल्ह्यातही  जोरदार वाहू लागलेत. विक्रमगड मतदार संघ म्हणजे डोंगरी भागात वसलेला मतदार संघ आहे. कुपोषण, बेरोजगारी, स्थलांतर या समस्यांनी पिडलेला मतदार संघ आहे. पालघरमधील विक्रमगड विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला. २०१४ च्या निवडणुकीत स्वतंत्रपणे लढूनही भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी या प्रमुख प्रतिस्पर्धी पक्षांवर विजय मिळवला. मात्र पाहिजे तसा विकास ह्या मतदार संघात दिसत नसल्याने सत्ताधारी भाजपवर नाराजीचे सूर उमटायला सुरुवात झाली आहे.


विधानसभा मतदारसंघाच्या पुर्नरचनेनंतर नव्याने अस्तित्वात आलेला विक्रमगड विधानसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे.  पूर्वीच्या जव्हार मतदारसंघावर असलेलं माकपचं वर्चस्व संपुष्टात आणून भाजपने या मतदारसंघावर आपलं वर्चस्व निर्माण केलंय.

२०१४ च्या निवडणुकीत माजी मंत्री विष्णु सवरा यांनी भाजप शिवसेना युती नसताना आपला मतदारसंघ बदलून विक्रमगडमधून निवडणूक लढविण्याचा धोका पत्करला होता. निवडणुकीदरम्यान तत्कालीन आदिवासी आमदारांविरोधात सुरु असलेल्या बिगर आदिवासी आंदोलनाचा लाभ उठवत सवरांनी शिवसेनेच्या प्रकाश निकम आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सुनील भुसारांना धूळ चारली, मात्र त्यांना अपेक्षित मताधिक्य मिळालं नाही. 2014  च्या निवडणुकीत भाजपचे विष्णू सवरा आणि शिवसेनेचे प्रकाश निकम यांच्यात चुरशीची लढत झाली. तर राष्ट्रवादीचे सुनील भुसारा हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. या तिघांमध्ये प्रचंड रस्सीखेच होताना त्यावेळी पहायला मिळाली. कोण जिंकेल याची उत्सुकता शेवटपर्यंत ताणली गेली होती. त्यावेळी सवरा अत्यंत कमी मताधिक्याने विजयी झाले. अत्यंत चुरशीच्या लढतीत सवरा सहाव्यांदा विधानसभेवर गेल्याने त्यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडली. आदिवासी विकाससारखे महत्वाचे मंत्रिपद लाभूनही सवरा मतदारसंघातील मूलभूत प्रश्न सोडवू शकले नाहीत असा आरोप विरोधक करत आहेत.

भाजपच्या विष्णू सवरा यांना  ४०२०१ मते मिळाली 

शिवसेनेच्या प्रकाश निकम यांना ३६३५६ मते मिळाली

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुनील भुसारा यांना ३२०५३ मते मिळाली 

तर बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांना १८०८५ मते मिळाली

विक्रमगड मतदारसंघात आदिवासी मतदारांचे प्राबल्य आहे. आगामी निवडणुकीत भाजपला कडवं आव्हान देण्याचा प्रयत्न काँग्रेस, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी करताना दिसतेय. तर युती झाल्यास शिवसेनाही या मतदारसंघावर दावा करतेय त्यामुळे आगामी काळात भाजपपुढे डोकेदुखी वाढेल अशी चित्र पहावयास मिळतंय.


विक्रमगड विधानसभेत आजवर भाजप सातत्याने विधानसभा क्षेत्राबाहेरील उमेदवार लादत असल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांकडून स्थानिक उमेदवार द्यावा अशी मागणी जोर धरतेय. मतदारसंघाच्या निर्मितीनंतर चिंतामण वनगा आणि विष्णू सवरा ह्या मतदारसंघाबाहेरील उमेदवारांना भाजपने निवडून आणले. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये अन्याय होत असल्याची भावना आहे. याचाच फटका २०१९ लोकसभा निवडणुकीत शिवसेना - भाजप युतीला बसला. शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावितांना विक्रमगड मतदारसंघात  पिछाडीवर रहावं लागलं. बहुजन विकास आघाडी, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस आघाडीने विक्रमगडमध्ये मिळवलेलं मताधिक्य ही भाजपसाठी धोक्याची घंटा आहे.

तर ह्या मतदार संघात सध्या काही संघटना आणि सामाजिक संस्थाही उभारीचे काम करत आहेत. त्यामध्ये जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था आपले पाय रोवू लागली आहे. गेल्या तीन वर्षात शैक्षणीक कामाबरोबर आरोग्य आणि इतर सामाजिक प्रश्न गावागावात जाऊन सोडवण्याचे काम या संस्थेमार्फत करण्यात येतेय. यातच विक्रमगड नगरपरिषद ही या जिजाऊ सामाजिक संस्थेने काबीज केली आहे. त्यामुळे कोकण विकास मंच आणि जिजाऊ संस्थेकडून विक्रमगडचे विद्यमान नगराध्यक्ष रवींद्र खुताडे ही संभाव्य उमेदवारही रिंगणात उतरण्याची चिन्हे आहेत

विक्रमगड विधानसभा मतदार संघात भाजपकडून हरीचंद्र भोये, विष्णू सवरा, शिवसेनेकडून प्रकाश निकम, राष्ट्रवादीकडून सुनील भुसारा, कोकण विकास मंचकडून रवींद्र खुताडे हे इच्छुक आहेत. त्यामुळे विक्रमगड विधानसभा मतदार संघात मोठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.