बीड : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीतील यंदाची निवडणूक वेगळीच पाहायला मिळत आहे. राज्यात प्रथमच तीन पक्ष एकत्रितपणे निवडणुकीच्या रणांगणात आहेत. त्यामुळे, महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना होत असून बीड जिल्ह्याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. गत लोकसभा निवडणुकीतील निकालानंतर बीड (Beed) जिल्ह्यासह अवघ्या मराठवाड्यात मराठा आरक्षण व मनोज जरांगे पॅटर्नची चर्चा झाली. त्यामुळे, विधानसभा निवडणुकीतही येथील मतदारसंघात त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर त्यांनी विधानसभा निवडणूक (Vidhansabha Election) न लढविण्याचा निर्णय घेतला. बीड जिल्ह्यातील 6 पैकी महत्त्वाचा मतदारसंघ असलेल्या माजलगावमध्ये (Majalgaon) यंदा तिरंगी लढत होत आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी माजलगाव राज्यात चर्चेत आले होते. येथील आमदारांच्या घरासमोरच जाळपोळीची घटना घडली होती. त्यामुळे, मतदारसंघात तणावाचे वातावरण पाहायला मिळाले.
विधानसभा निवडणुकीतही बीड जिल्ह्यात जातीय समीकरणे जुळवण्यात आली आहेत. माजलगाव विधानसभा मतदारसंघातील तीनही उमेदवार मराठा समाजाचे आहेत. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होत असून मतदार कोणाच्या पारड्यात आपलं मत टाकतात हे पाहावं लागेल. माजलगावचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांनी राजकीय सन्यास घेत असल्याची घोषणा केली होती. मात्र, अजित पवारांकडून त्यांनाच उमेदवारीचा आग्रह करण्यात आला. त्यामुळे, राष्ट्रवादी महायुतीकडून माजलगाव मतदारसंघासाठी प्रकाश सोळंके यांचे नाव जाहीर करण्यात आले. त्यानंतर, प्रकाश सोळंके यांचे पुतणे नाराजी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. कारण, सोळंके यांनी त्यांच्या पुतण्याला आपला राजकीय वारसदार म्हणून घोषित केले होते. तर, विधानसभेसाठी त्यांनी तयारीही सुरू केली होती.
दरम्यान, माजलगाव मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी हा सामना पाहायला मिळत आहे. तर, रमेश आडसकर हे अपक्ष उमेदवारही मैदानात आहेत.
2019 साली प्रकाश साळुंके विजयी
2019 च्या विधानसभा निवडणुकीत माजलगाव मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आघाडीचे उमेदवार असलेल्या प्रकाश सोळंके यांनी विजय मिळवला होता. प्रकाश सोळंके यांनी भाजप नेते रमेश आडसकर यांचा 12,890 मतांनी पराभव केला होता. सध्या रमेश आडसकर हे विधानसभेच्या रिंगणात अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे, येथील रंगत वाढली आहे. कारण, महायुतीचे उमेदवार म्हणून यंदा प्रकाश सोळंके यांना तिकीट देण्यात आलंय. तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मोहन जगताप निवडणूक लढवत आहेत.
लोकसभा निवडणुकीत माजलगावमध्ये कोणाला लीड?
राज्यात लोकसभा निवडणुकीत बीड जिल्हा केंद्रस्थानी होता. कारण, मनोज जरांगे पाटील यांचं मूळगाव असलेला हा जिल्हा आहे. त्यामुळे, त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष होते. बीड जिल्ह्यात पहिल्यांदाच जातीय वळणावर ही निवडणूक गेली. त्यामुळेच, येथील मतदारसंघात मराठा समाजाचे बजरंग सोनवणे हे 6 हजार मतांच्या फरकाने विजयी झाले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या येथील मतदारसंघात माजलगाव मतदारसंघातून अवघ्या 935 मतांचे मताधिक्य पंकजा मुंडेंना आहे. त्यामुळे, येथील मतदारसंघात विधानसभेची निवडणूक देखील चुरशीची बनल्याचं पाहायला मिळत आहे.