Vidhansabha Election 2024: नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून (Election Commission Of India) विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election 2024) तयारी सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू काश्मीर राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आयोगाने निवडणूक याद्या अद्ययावत करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. घरोघरी जाऊन मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मतदान केंद्राच्या काही अडचणी असतील, त्या दूर केल्या जाणार आहेत.
आगामी 25 जूनपासून म्हणजेच येत्या चार दिवसांपासून महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड, जम्मू काश्मीर या ठिकाणी निवडणुकीच्या आधीची तयारी सुरु होणार आहे. 18 व्या लोकसभेसाठीची निवडणूक पार पडल्यानंतर आता निवडणूक आयोगाने महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा या ठिकाणी निवडणूक पूर्वतयारी सुरु केली आहे. हरियाणा विधानसभेचा कार्यकाळ 3 नोव्हेंबर, महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर तर झारखंड विधानसभेचा कार्यकाळ 5 जानेवारी 2025 ला संपणार आहे. त्यादृष्टीने आता राज्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्यासंबंधी सूचना करण्यात आल्या आहेत.
लोकसभेसाठी 64.2 कोटी लोकांनी मतदान केलं
भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत मतदान प्रक्रियेची माहिती दिली. हा एक चमत्कार आहे. जे झालं तो चमत्कार आहे. आपल्यासाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे. जगभरात आपण एक विक्रम प्रस्थापित केला आहे. या निवडणुकीत 64.2 कोटी मतदारांनी मतदान केलं आहे. या निवडणुकीत एकूण 31.2 कोटी महिलांनी मतदान केले, असे राजीव कुमार यांनी सांगितले.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीला घवघवीत यश-
लोकसभा निवडणुकीचा निकाल याच महिन्यातील (जून) 4 तारखेला लागला. यामध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीने घवघवीत यश संपादन केले आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या एकूण 48 जागांपैकी 30 जागांवर मविआचे उमेदवार विजयी झाले. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात काँग्रेसला घरघर लागली होती. अनेक बड्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. तर पक्षात पडलेल्या फुटीमुळे ठाकरे गट आणि शरद पवार गटाचीही अवस्था तितकीशी चांगली नव्हती. भाजपच्या अजस्त्र यंत्रणेसमोर हे पक्ष कितपत टिकाव धरतील, याबाबत साशंकता होती. मात्र, मविआने 30 जागा जिंकत या सर्व शंका-कुशंका फेटाळून लावल्या. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकाला सामोरे जाताना मविआतील तिन्ही पक्षांचा आत्मविश्वास कैकपटीने वाढला आहे.
लोकसभा निवडणुकीतील देशपातळीवरील समीकरणं-
एनडीए आघाडी- 294
इंडिया आघाडी- 232
इतर- 17
महाराष्ट्रातील खासदारांचे पक्षीय बलाबल-
महाविकास आघाडी- 30+1 (अपक्ष)
महायुती- 17