मुंबई : विधानसभा निवडणुकीमुळे (Vidhan Sabha Election 2024) संपूर्ण महाराष्ट्राचे वातावरण सध्या राजकारणमय झाले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) यांच्यात सध्या जागावाटपावर चर्चा चालू आहे. एकीकडे या दोन्ही आघाड्यांनी निवडणुकीसाठी कंबर कसलेली असताना दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीनेदेखील (Vanchit Bahujan Aghadi) दंड थोपटले आहेत. वंचितने काही जागांवर आपले उमेदवार जाहीर केले असून नेते जोमाने प्रचार करत आहेत. दरम्यान अशाच एका प्रचारसभेत बोलताना सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. आम्ही राज ठाकरे यांचे भोंगे उतरवू असे सुजात आंबेडकर म्हणाले आहेत.      


सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले?


सुजात आंबेडकर वाशिममध्ये आयोजित केलेल्या एका प्रचारसभेत बोलत होते. यावेळी बोलताना "मोठ्या स्पीकरवर, भोंग्यांवर हनुमान चालिसा लावले तर त्याला विरोध करण्याचं काम तसेच राज ठाकरे यांचा भोंगा उतरवण्याचं काम वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते करतील. जोपर्यंत पाच ते सहा मुस्लीम उमेदवार निवडून येणार नाहीत, तोपर्यंत मुस्लीम समाजाचं भलं कोणीही करू शकत नाही," असं सुजात आंबेडकर म्हणाले. 


15 टक्के भागिदारी देईल, त्यालाच...


तसेच, "काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे प्रस्थापित नेते आपला विकास करू शकत नाही. महाराष्ट्रात मुस्लिमांची संख्या 15 टक्के आहे. जो पक्ष आम्हाला 15 टक्के भागिदारी देईल, 15 टक्के उमेदवारी देईल, त्यालाच मुस्लीम समाज मतदान करेल," असेही सुजात आंबेडकर म्हणाले.


विधानसभा निवडणुकीत नेमकं काय होणार? 


दरम्यान, यावेळच्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने एकला चलो रे ची भूमिका घेतली आहे. वंचितने आपल्या उमेदवारांच्या आतापर्यंत तीन याद्या जाहीर केल्या आहेत. वंचितची तिसरी यादी 16 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली. लवकरच आणखी जाही जागांवर हा पक्ष आपले उमेदवार देणार आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित आणि महाविकास आघाडी यांच्यात युतीचे अनेक प्रयत्न झाले. मात्र शेवटी लोकसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. यावेळीही वंचित स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे. त्यामुळे या निवडणुकीत नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा :


VBA Candidate : विधानसभेत काँग्रेसच काय कुणालाही पाठिंबा नाही, वंचित नेते प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले, म्हणाले....


'प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी बरखास्त करावी अन्.., रामदास आठवलेंकडून मोठी ऑफर


उद्धव ठाकरेंचा धमाका, तब्बल 32 उमेदवार जवळपास निश्चित, संभाव्य यादी 'माझा'च्या हाती!