मुंबई : एकीकडे राज्यसभेच्या जागांवरुन राजकारण तापलेलं असतानाच विधानपरिषद निवडणुकांची घोषणा झाली आहे. राज्यातील विधानपरिषदेच्या दहा  जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत कोणाला संधी मिळणार आणि कोणाला डच्चू? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.


राज्यसभेपाठोपाठ विधानपरिषदेच्या दहा जागांचं बिगुल देखील वाजलं आहे. विधानपरिषदेच्या 10 जागा रिक्त झाल्याने 20 जून रोजी निवडणूक होत आहे. 2 जून रोजी कार्यक्रम घोषित होईल. 9 जूनपर्यंत नांमकन दाखल करता येईल तर 13 जून ही माघारीची अंतिम मुदत आहे. त्यामुळे विधानपरिषदेवर कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आहे.


विधानपरिषदेतून कोणकोण निवृत्त होत आहे?



  • भाजप : प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, सुजित सिंह ठाकूर, सदाभाऊ खोत, विनायक मेटे आणि दिवंगत आर एस सिंह यांचा समावेश आहे.

  • शिवसेना : दिवाकर रावते आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई निवृत्त होत आहेत. 

  • राष्ट्रवादी काँग्रेस : रामराजे निंबाळकर आणि संजय दौंड हे निवृत्त होत आहेत.


विधानपरिषदेवर भाजपच्या चार जागा सहज निवडून येतील तर महाविकास आघाडीच्या सहा जागा निवडून येतील. सध्या निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये काँगेसचा एकही सदस्य नाही, यावेळी मात्र अपक्ष आणि मित्र पक्षांच्या मदतीने काँग्रेसला दोन उमेदवार विधानपरिषदेवर पाठवता येतील.


विधानपरिषदेवर निवडून येण्याचे गणित काय?



  • विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची 27 मतांची आवश्यकता आहे. 

  • भाजप आणि मित्रपक्ष यांचं संख्याबळ 113 इतकं आहे.

  • त्यामुळे भाजपच्या 4 जागा सहज निवडून येऊ शकतात.

  • महाविकास आघाडीकडे 169 संख्याबळ आहे.

  • त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन आमदार विधान परिषदेत जातील. 

  • तर मित्र पक्ष आणि अपक्षांच्या मदतीने काँग्रेसच्या वाट्यालाही दोन जागा येऊ शकतात.


विधानसभेतील आकडे आणि संभाव्य गणितांवर नजर टाकली तर विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जागांवर संधी मिळावी म्हणून प्रत्येक पक्षातील नेत्यांकडून लॉबिंग सुरु आहे. आता यात नेमकी कुणाला संधी मिळते हे पाहणं महत्त्वाचं आहे.