मुंबई : बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी कथित भ्रष्टाचार प्रकरणात माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली आहे. याबाबत सचिन वाझेंनी विशेष सीबीआय न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. सीबीआयने त्याच्या अर्जाला सशर्त मंजुरी दिली असून येत्या 30 मे रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे. या कथित भ्रष्टाचार प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अन्य आरोपींविरोधात आपल्याकडे असलेली माहिती देण्याची तयारी सचिन वाझेंनी दाखवली आहे. 'एएनआय' वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलं आहे. सचिन वाझेंच्या या अर्जामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.


माफीचा साक्षीदार होण्यासाठी सचिन वाझेला सर्व तरतुदी तसंच कायदेशीर अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत. विशेष सीबीआय कोर्टाने सचिन वाझेचा अर्ज स्वीकारला तर त्यांचा जबाब फिर्यादी साक्षीदार म्हणून नोंदवला जाईल. तसंच इतर आरोपींविरुद्ध पुरावे वापरले जाऊ शकतात. महत्त्वाचं म्हणजे सचिन वाझेला खटल्याला सामोरं जावं लागणार नाही.


सचिन वाझेंनी याआधी फेब्रुवारी महिन्यात ईडीला पत्र लिहून अशीच विनंती केली होती. मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपींविरोधात माफीचा साक्षीदार बनण्यास तयार असल्याचं सचिन वाझेंनी या लेखी पत्रात म्हटलं होतं. आता याच प्रकरणात सचिन वाझेंनी कलम 306 अंतर्गत वकील रौनक नाईक यांच्यामार्फत माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज केला आहे.


आधी NIA कडून अटक, मग सीबीआयकडून बेड्या 
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आल्याच्या तसेच त्या गाडीचा मालक मनसूख हिरेनच्या अचानक मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे, त्यांचा सहकारी रियाझ काझी आणि पोलीस निरिक्षक सुनील मानेंला एनआयएकडून प्रथम अटक करण्यात आली होती. 


तर दुसरीकडे ईडीने सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतरांविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने भ्रष्टाचारा प्रकरणात 4 एप्रिलला सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतर दोघांना अटक केली होती. आपण अनिल देशमुख यांच्या आदेशानुसार मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटकडून पैसे गोळा केल्याचं सचिन वाझेने तपासादरम्यान सांगितलं होतं.


मनी लाँड्रिग प्रकरणात वाझेंचा जामीन अर्ज फेटाळला
मन लाँड्रिंग प्रकरणात सचिन वाझे यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने 20 मे रोजी फेटाळून लावला होता. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मनी लाँण्ड्रिग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) वाझे यांचीही चौकशी केली होती. त्याच मनी लाँण्ड्रिग प्रकरणात जामीन देण्यात यावा, अशी मागणी करणारा अर्ज वाझेकडून विशेष पीएमएलए न्यायालयात दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात ईडीकडून तपास पूर्ण झाला असून आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणात आपल्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही त्यामुळे आपल्याला जामीन देण्यात यावा, अशी मागणी वाझेंच्या वतीने याचिकेतून करण्यात आली होती. परंतु ईडीन वाझेंच्या अर्जाला तीव्र विरोध केला. माजी गृहमंत्री देशमुखांच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणात वाझेंचाही तेवढाच सहभाग होता. तोच संपूर्ण कटाचा मुख्य सूत्रधार आहे. जामीन मिळाल्यास तो फरार होण्याची शक्यता आहे. तसेच वाझे हा प्रभावशाली व्यक्ती असून जामीनावर सोडल्यास आपल्या आर्थिक सामर्थ्यावर तो तपासाची दिशा बदलून तो साक्षीदारांवरही प्रभाव टाकू शकतो, असा दावाही ईडीच्या वतीने अॅड. सुनील गोन्साल्विस यांनी केला होता. न्यायालयाने ईडीची बाजू ग्राह्य धरत वाझेचा जामीन अर्ज फेटाळून लावला.