मातोश्रीच्या अंगणातला मतदारसंघ म्हणून वांद्रे पूर्व मतदारसंघ हा शिवसेनेसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा राहिला आहे. मुंबई उपनगरांतला मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातला हा विधानसभा मतदारसंघ आहे. सध्या या ठिकाणी शिवसेनेच्या तृप्ती सावंत या विद्यमान आमदार आहेत तर भाजपच्या पूनम महाजन या विद्यमान खासदार. हा मतदारसंघ लोकसभा क्षेत्रासाठीही महत्वाची भूमीका बजावणारा राहिला आहे.

असा आहे वांद्रे पूर्व मतदारसंघ
शिवसेना पक्षाध्यक्षांचे निवासस्थान अर्थात मातोश्री याच मतदारसंघात असल्यामुळे हा शिवसेनेचा गडच मानला जातो. सुरुवातीपासूनच शिवसेनेचं वर्चस्व इथे राहिलेलं आहे. निवडणूकीच्या काळात तर मातोश्रीवर  होणाऱ्या बैठका, दिवस-रात्र होणारी खलबतं यामुळे हा मतदारसंघ खरोखरीच मातोश्रीचा गड वाटायला लागतो. आणि हा गड जिंकणं शिवसेनेसाठी प्रतिष्ठेचं ठरतं. वांद्रे पूर्व म्हटलं की मातोश्री निवासस्थान, बीकेसीचा कॉरपोरेट परिसर, मराठी मध्यमवर्गीय माणसाच्या शासकीय वसाहती आणि वांद्रे स्टेशनला लागून असणारी मोठी झोपडपट्टी हे परिसर नजरेसमोर येतात. वांद्रे पूर्वमधील बीकेसीच्या विविध कार्यालयांमुळे स्टेशनकडून दररोज वांद्रे पूर्व मध्ये येणारी चाकरमान्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे वांद्रे पूर्व हा परिसर कायमच गजबजलेला परिसर आहे. मध्यमवर्गीय मतदारांचं या मतदारसंघात प्राबल्य आहे. मराठी मध्यमवर्गासोबतच हिंदी भाषिक आणि मुस्लीम मतदारांचं प्रमाण देखील इथे लक्षणीय आहे. त्यामुळेच एमआयएमचे सिराज खान यांनी 2014 आणि 2015 च्या पोटनिवडणुकीत देखील तिसऱ्या क्रमांकाची मतं इथे मिळवली आहेत. या मतदारसंघात एकूण 254 मतदान केंद्र आहेत.

इतिहास आणि सद्यस्थिती काय सांगते

हा मतदारसंघ गेल्या 2014 च्या निवडणुकीत सर्वांत जास्त चर्चेत राहिला. यावेळी प्रकाश उर्फ बाळा सावंत हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सलग दुसऱ्यांदा या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. मात्र, 2015 मध्ये त्यांचं निधन झालं. या पार्श्वभूमीवर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी तृप्ती सावंत शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आल्या. काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या नारायण राणेंचा त्यांनी 20 हजार मतांनी पराभव केला होता.  या पोटनिवडणुकीत थेट मातोश्रीच्या अंगणातला गड जिंकण्यासाठी काँग्रेसकडून नारायण राणे शड्डू ठोकून उभे राहिले खरे. मात्र, नारायण राणेंना शिवसेनेनं मातोश्रीच्या अंगणातच आस्मान दाखवलं आणि त्यांच्या राजकिय कारकिर्दीवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं. बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांचा शिवसेनेकडून पोटनिवडणुकीत विजय झाल्यानंतर शिवसैनिकांनी केलेला जल्लोष आणि नारायण राणेंची उडवलेली खिल्ली कुणालाही विसरता येणार नाही.

हे देखील वाचा -चांदिवली विधानसभा मतदारसंघ | नसीम खान यांच्यासमोर यंदा तगडे आव्हान

त्यामुळे, तसा शिवसेनेचाच म्हणून ओळखला जाणारा हा गड तसा सहजासहजी पाडणं कुणाला शक्य होणार नाही. मात्र, यंदा मातोश्रीच्या अंगणातल्याच गडाच्या तटबंद्या मजबूत करणं शिवसेनेला गरजेचं होऊन बसलंय. याचं कारण म्हणजे शिवसेनेचा हक्काचा मराठी मतदार सेनेच्या हातातून सुटतो की काय? अशी परिस्थिती आहे. शासकीय वसाहतीतले मराठी मतदार शिवसेनेवर नाराज आहेत. गेली अनेक वर्षे आश्वासनांवर आश्वासने मिळूनसुद्धा शासकीय वसाहतीतील जुन्या इमारतींचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. हा मतदार कदाचित मनसेच्या पारड्यात आपलं मत टाकू शकतो. तर, दलित आणि मुस्लिम मतं एकगठ्ठा एमआयएमकडे जाऊ शकतात. त्यातच, विद्यमान आमदार तृप्ती सावंत मतदारसंघात फारशा फिरलेल्या नाहीत.
चर्चेत कुणाकुणाची नावे

शिवसेनेकडून महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे या मतदारसंघासाठी इच्छुक आहेत. विद्यमान आमदारांना ही सिट मिळाली नाही तर ती विद्यमान महापौरांनाच मिळण्याची शक्यता  आतापर्यंत सर्वांना वाटत होती. पण, महापौरांना सीट मिळणार या शक्यतेवर आता ग्रहण लागलंय. कारण, गेल्या काही दिवसांतल्या महापौर विश्वनाथ महाडेश्वरांची वक्तव्य त्यांना चांगलीच महागात पडू शकतात. याच मतदारसंघातल्या लोकांनी महाडेश्वरांसमोर काही दिवसांपूर्वी परत जा परत जा अशा घोषणाही दिल्या होत्या. त्यामुळे, महापौरांची वक्तव्य भोवली तर मातोश्री हा धोका पत्करणार नाही. शिवसेनेकडून दुसरं सर्वात मोठं चर्चेत असणारं नाव म्हणजे शिवसेनेचे सदा परब. सदा परबांकडे वांद्रे पूर्व विधानसभा संघटकपदाची जबाबदारी लोकसभा निवडणुकीदरम्यान देण्यात आली होती. ते या मतदारसंघात चांगला जनसंपर्क ठेवून आहेत. त्यांमुळे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना ऑप्शन हा सदा परबांचा असेल.

मनसेकडून यंदा अखिल चित्रेंनी याठिकाणी दोरदार फिल्डिंग लावलीय. काँग्रेसचे बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशांत सिद्दीकीसाठीही जोर लावला जातोय. एमआयएमच्या रुपानं वंचित बहुजन आघाडीचा इथला जोर वाढलेला असेल.

गेल्या निवडणुकीत शिवसेनेला जोरदार टक्कर दिली होती ती त्यांच्याच मित्रपक्षानं. भाजपकडून महेश पारकर त्यावेळी मैदानात होते. महेश पारकरांनी 2014 मध्ये दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. मात्र, त्यावेळी भाजप-सेनेची युती तुटली होती. ही तुटलेली युती पोटनिवडणुकीत मात्र पुन्हा जुळून आली आणि तृप्ती सावंताचा विजय होऊन शिवसेनेचा गड राखला गेला.

आदित्य ठाकरेंसाठी मातोश्रीचाच मतदारसंघ सेफ नाही

सुरुवातीला आदित्य ठाकरेंच्या लाँचिन्गसाठी वांद्रे पूर्व मतदारसंघाचं नावही चर्चेत होतं. पण, 100% सेफ मतदारसंघ नसल्यानं आदित्य ठाकरेंना वांद्रे पूर्व मधून उतरवणं धोक्याचं मानलं गेलं. गेल्या विधानसभेच्या वेळी बाळा सावंतांच्या निधनानं सहानुभूतीची लाट शिवसेनेकडून होती. तसंच, नारायण राणेंना पाडण्यासाठी पोटनिवडणुकीत शिवसैनिकांनी दिवस-रात्र एक केला. मात्र, यावेळी स्थानिक मराठी मतदारांची नाराजी आणि मनसे इफेक्ट  शिवसेनेला महागात पडू शकतो. त्यामुळे, अगदी मातोश्री समोरचा मतदारसंघ असला तरी आदित्य ठाकरेंसाठी पदार्पणातच हा मतदारसंघ नको असं जुन्या-जाणत्या शिवसैनिकांचं मत पडलं. त्यामुळे आदित्य ठाकरेंसाठी वांद्रे पूर्व मतदारसंघाचं नाव मागे पडलं. आदित्य ठाकरेंसाठी आता वरळी मतदारसंघाचं नाव चर्चेत आहे.

गड शिवसेनेचाच असला तरी कष्टानं लढवावा तर लागणारच
मुंबईच्या महापौरांवर असलेला मतदारांचा रोष, शासकीय वसाहतीतील मराठी माणसाची नाराजी आणि मनसे, वंचितचं कडवं आव्हान यामुळे यंदा शिवसेनेला गड स्वत:चा असला तरी गाफिल राहता येणार नाही.यंदाच्या निवडणुकीत वांद्रे पूर्वचा उमेदवार ठरवतांना शिवसेनेला तो दहा वेळा पडताळून पहावा लागेल, तर आणि तरच सेना आपल्या अंगणातला गड वाचवू शकेल.

जाणून घ्या या मतदारसंघाविषयी