Uttar Pradesh Assembly Elections 2022 : उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. यासोबतच राजकीय पक्षांनीही कंबर कसली आहे. निवडणुकीची तारीख जाहीर होताच यूपी भाजपने निवडणुकीचे पोस्टर जारी केले. भाजप आगामी विधानसभा निवडणूक पीएम मोदी आणि सीएम योगी यांच्या चेहऱ्यावर लढणार असल्याचं पक्षानं स्पष्ट केलं आहे. यासोबतच योगी आदित्यनाथ हे भाजपकडून मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील हेही निश्चित झाले आहे.


यूपी भाजपने जारी केलेल्या निवडणुकीच्या पोस्टरवर लिहिले आहे की, "मोदी है तो मुमकीन है, योगी हैं तो यकीन है…" यापूर्वी उत्तर प्रदेशातील योजनांच्या पायाभरणी आणि लोकार्पण कार्यक्रमात पंतप्रधान मोदी आणि सीएम योगी हे एकत्र दिसून आले होते. तसेच यापूर्वीही पंतप्रधान मोदी अनेकदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगींचं कौतुक करताना दिसून आले होते. 


सर्वच पक्षांकडून विजयी होण्याचा सूर 


दुसरीकडे निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या विजयाचा दावा केला आहे. भाजपने पूर्ण बहुमतासह 300 हून अधिक जागा जिंकण्याचा दावा केला आहे. त्याच वेळी, सपानं आयोगाकडे डिजिटल स्पेससाठी नियम बनवण्याची मागणी केली आहे. निष्पक्ष निवडणुकांचा विश्वास व्यक्त करत बसपानं कार्यकर्त्यांना आचारसंहितेचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेस पक्ष युवक, शेतकरी, महिला, कामगार, व्यापारी आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढण्याचा पुनरुच्चार केला आहे.


समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले की, 10 मार्च रोजी भाजपचा पराभव होणार असून संपूर्ण राज्य या दिवसाची वाट पाहत आहे. यासोबतच अखिलेश यांनी निवडणूक आयोगाच्या त्या आदेशावरही आक्षेप घेतला. ज्यामध्ये 15 जानेवारीपर्यंत एकही रॅली होणार नसल्याचं म्हटलं होतं. काँग्रेसच्या यूपी प्रभारी प्रियंका वाड्रा यांनी सांगितलं की, 10 मार्च रोजी उत्तर प्रदेशातील युवक, शेतकरी, महिला, कामगार, व्यापारी आणि सामान्य लोकांचा विजयी मोर्चा निघणार आहे.


दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने काल देशातल्या पाच राज्यांसाठी निवडणुकांच्या वेळापत्रकाची घोषणा केली. 5 राज्यांच्या निवडणुका 7 टप्प्यात होणार आहेत. तर पाचही राज्यांची मतमोजणी 10 मार्चला पार पडणार आहेत.


उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं


उत्तर प्रदेशमधील निवडणुका जाहीर झाल्या आहेत. उत्तरप्रदेशात 403 जागांसाठी सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. उत्तरप्रदेशात  पहिला टप्पा 10  फेब्रुवारी आणि दुसरा टप्पा 14 फेब्रुवारीला पार पडणार आहे. तर तिसरा, चौथा, पाचवा, सहावा आणि सातवा अनुक्रमे  20 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवार,  3 मार्च आणि 7 मार्चला पार पडणार आहे.  निवडणुकांचे निकाल 10 मार्चला येणार आहे. 


निवडणुका जाहीर केल्यानंतर उत्तरप्रेदशात आचार संहिता लागू करण्यात आली आहे. निवडणुकांदरम्यान कोरोनासंबंधित नियमांचे देखील पालन करयाचे आहे. यामध्ये सर्व पदयात्रा, सभांवर बंदी घालण्यात आलेली आहे. निवडणुक काळात कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह