नवी दिल्ली : काँग्रेसचा झेंडा हाती घेतलेली अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला उमेदवारी जाहीर झाली आहे. उत्तर मुंबई मतदारसंघातून उर्मिला लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहे. भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांना उर्मिला टक्कर देणार आहे.

याआधी अभिनेता गोविंदाने उत्तर मुंबईतून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. तेव्हा गोविंदाने भाजपचे बडे नेते राम नाईक यांना मोठ्या मताधिक्याने पराभूत केलं होतं. त्यामुळे यंदा उर्मिला त्याची पुनरावृत्ती करणार की गोपाळ शेट्टी आपला गड कायम राखणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

दरम्यान, आपला लढा काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधात आहे, कुठल्याही उमेदवाराविरोधात नाही, अशी प्रतिक्रिया उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी दिली आहे. उर्मिला यांनी निवडणूक लढवत एकप्रकारे आपल्याला मदत केली आहे. आपण मोठ्या मताधिक्याने विजयी होऊ, असा विश्वास शेट्टींनी व्यक्त केला आहे.

VIDEO | पुण्याचा काँग्रेसचा उमेदवार अद्याप अनिश्चित



युतीच्या सरकारनंतर देशात विकासापेक्षा हिंसक वातावरण वाढलं आहे, असा घणाघात उर्मिला मातोंडकरने 'एबीपी माझा'शी बोलताना केला होता. देशभक्ती किंवा धर्म काय हे सांगणारा भाजप कोण? असा थेट सवालही उर्मिलाने विचारला होता.

लहानपणापासूनच महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांनी प्रभावित असल्याचं उर्मिलाने बुधवारी काँग्रेसप्रवेश करताना सांगितलं होतं.



उर्मिलाची कारकीर्द

1977 साली वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी उर्मिलाने 'कर्म' चित्रपटातून बालकलाकार म्हणून कारकीर्द सुरु केली. 1980 मध्ये श्रीराम लागूंसोबत झाकोळ चित्रपटातही ती झळकली. वयाच्या नवव्या वर्षी (1983) तिने शेखर कपूर यांच्या 'मासूम'मध्ये केलेली भूमिका विशेष गाजली. 'लकडी की काठी...' हे तिचं गाणं आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.
देशभक्ती किंवा धर्म म्हणजे काय, हे सांगणारा भाजप कोण? काँग्रेसवासी उर्मिला मातोंडकरचा सवाल

उर्मिलाने तिच्या कारकीर्दीत रंगिला, सत्या, दौड, जुदाई, कौन, मस्त, खुबसूरत, जंगल, भूत, पिंजर अशा असंख्य चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. राम गोपाल वर्मासोबत तिचे बरेच चित्रपट गाजले. ईएमआय (2008) या चित्रपटानंतर ती हिंदीत मुख्य भूमिकेत झळकली नाही.

3 मार्च 2016 रोजी उर्मिलाने वयाने दहा वर्षांनी तरुण असलेल्या बिझनेसमन आणि मॉडेल मोहसीन अख्तर मीरसोबत विवाहगाठ बांधली. वयाच्या 45 व्या वर्षी उर्मिलाने राजकीय कारकीर्द सुरु केली