Up Election Result 2022 : पाच राज्यांतील निवडणुकांचे सर्वच निकाल जवळपास समोर आले आहेत. यात चार राज्यांमध्ये भाजपने मुसंडी मारली आहे. तर पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने एतिहासिक विजय मिळवला आहे. परंतु, उत्तर प्रदेशमध्ये असदुद्दीन ओवेसी यांच्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) चे उमेदवार पाच हजार मतांचा आकडा देखील पार करू शकले नाहीत. उत्तर प्रदेश विधानसभेच्या 403 जागांवर आत्तापर्यंतच्या निकालांच्या आधारे एआयएमआयएमला अर्धा टक्‍क्‍यांपेक्षाही कमी मते मिळाली आहेत.  


निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सायंकाळी चार वाजेपर्यंत एआयएमआयएमचे उमेदवार कमर कमाल यांना आझमगडमधून 1368 मते मिळाली आहेत. देवबंद मतदार संघातून उमेर मदनी यांना 3145, जौनपूरमधून अभयराज यांना 1340, कानपूर कॅंटमधून मुइनुद्दीन यांना 754, लखनऊ सेंट्रलमधून सलमान यांना 463, रशीद यांना 1266, मुरादाबादमधून इमरान यांना 612 मते मिळाली आहेत. तर मुरादाबाद ग्रामीणमधून मोहिद फरगानी यांना 1771, निजामाबादमधून अब्दुर रहमान अन्सारींना 2116, मुझफ्फर नगरमधून इंतेझार यांना 2642 , संदिलामधून रफिक यांना 1363, तांडा मतदारसंघातून इरफान  यांना 4886, मोहम्मद यांना फक्त 571 मते मिळाली असून बहराइच मतदार संघातून मोहम्मद जमील यांना 1747 मते मिळाली आहेत.  


निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरून मिळालेल्या माहितीनुसार, एआयएमआयएमला उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत 0. 43 टक्के मते मिळाली आहेत. एआयएमआयएमने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत 100 उमेदवार उभे करण्याचा दावा केला होता. ओवेसी यांनी मुस्लिम जास असलेल्या ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते. परंतु, उत्तर प्रदेशमधील मुस्लिम मतदारांनी ओवेसी यांच्या एआयएमआयएमला नाकारल्याचे पाहायला मिळत आहे.


दरम्यान, गेल्या विधानसभा निवडणुकीत ओवेसी यांच्या   एआयएमआयएमने 38 जागांवर निवडणूक लढवली होती. यापैकी 37 जागांवर त्यांच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती. 


महत्वाच्या बातम्या