UP Assembly Elections 2022 : निवडणूक आयोगान 5 राज्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानंतर राजकीय हालचालींना चांगलाच वेग आल्याचे चित्र दिसत आहे. निवडणूक जाहीर झालेल्या राज्यामध्ये एक महत्त्वाचे राज्य म्हणजे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. योगी सरकारमधले विद्यमान मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये खळबळ निर्माण झाली आहे. मात्र, स्वामी प्रसाद मौर्य यांनी नेमका राजीनामा का दिला. त्यामागची कारणे काय आहेत हे समजून घेतले पाहिजे.


स्वामी प्रसाद मौर्य यांनी राजीनामा दिल्यानंतर समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्याबरोबरचे त्यांचे फोटो भाजपची चिंता वाढवणारे होते. भाजपच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2017 मध्ये स्वामी प्रसाद मौर्य यांच्याबरोबर जे सदस्य निवडणूक आले होते, त्या सर्वांना पुन्हा तिकीट द्यावे अशी मौर्य यांची मागणी होती. तसेच अन्य दोन सहकाऱ्यांना देखील या निवडणुकीसाठी तिकीट द्यावे, अशी मौर्य यांची मागणी होती. या त्यांच्या मागण्या मान्य करण्यास भाजपने नकार दिला आहे. कारण सर्वेनुसार 2017 मधील अनेक सदस्य या निवडणुकीत हारण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा तिकीट द्यायचे की नाही यावर पक्ष विचार करत आहे. 


स्वामी प्रसाद मौर्य यांच्या एका समर्थकावर कोर्टात काही खटलेही सुरू आहेत. ते खटले मौर्य यांना संपवायचे होते. मात्र, आदर्श आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ते खटले मौर्य संपवू शकले नाहीत. निवडणुकीनंतर ते पूर्ण केले जाील असे आश्वास त्यांना देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. गेल्या आठवडाभरापासून स्वामी प्रसाद मौर्य आणि भाजप नेत्यांमध्ये सातत्याने चर्चा सुरू होती. मौर्य त्यांच्या मागण्यांवर ठाम होते. त्यामुळे भाजप आणि त्यांच्यात काही एकमत झाले नाही, अखेर त्यांनी राजीनामा दिला आहे.


मौर्य यांच्या राजीनाम्यानंतर भाजपने आता डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वामी प्रसाद मौर्य यांचे मन वळवण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्याकडे सोपवली आहे. केशव प्रसाद मौर्य इतर असंतुष्ट असलेल्या राजीनामा दिलेल्या आमदारांचे मन वळवण्याचा देखील प्रयत्न करणार आहेत. याचबरोबर उत्तर प्रदेश भाजपचे अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह आणि संघटनेचे सरचिटणीस सुनील बन्सलही या कामात गुंतले आहेत. आज मंत्री दारा सिंह चौहान यांना दिल्लीत बोलावण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची वरिष्ठ नेत्यांशी चर्चा होणार आहे. त्यामुळे राजीनामा दिलेल्या आमदारांचे मन वळवण्यात भाजपच्या नेत्यांना यश येते का ते बघावे लागेल. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर भाजपला हा मोठा धक्का मानला जातोय.