नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Aadityanath) हे अयोध्येत (Ayodhya) लढणार अशी चर्चा होत आहे. शिवसेना ही अयोध्येत आपला उमेदवार देणार आहे. मथुरेतून शिवसेना प्रचाराला सुरुवात करणार आहे, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे.  यूपीत 50 ते 100 जागा लढण्याचा विचार आहे, असंही ते म्हणाले. 


आज राकेश टिकैत यांच्याशी भेटणार आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीबाबत त्यांचा कल जाणून घेणार आहे. त्यानंतर आम्ही कुठं लढायचं, किती जागांवर लढायचं हे ठरवणार आहोत, असं राऊत म्हणाले. आम्ही उत्तरप्रदेशच्या सर्व भागात 50 ते 100 जागांवर निवडणूक लढवणार आहोत. यावेळी शिवसेनेला उत्तर प्रदेशमध्ये आपलं आस्तित्व दाखवायचं आहे. मला खात्री आहे यावेळी आम्ही ज्या पद्धतीनं लढायचं ठरवलं आहे, त्यामुळं आमचे सदस्य उत्तरप्रदेश विधानसभेत असतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 


संजय राऊत म्हणाले की, अयोध्येच्या मंदिरासाठी शिवसेनेनं मोठा संघर्ष केला आहे. आम्ही त्या विषयाला चालना दिली. याचं श्रेय कुणी दुसऱ्यांनी घेऊ नये. अयोध्येत, मथुरेत आम्ही निवडणूक लढवणार आहोत. मी दोन चार दिवसांनी मथुरेत जाणार आहे. 


...तर काँग्रेसला मोठा फटका बसेल...


संजय राऊत म्हणाले की, आम्ही काँग्रेसला म्हटलं की, गोव्यात चाळीसपैकी 30 जागा तुम्ही लढा. 10 आम्हाला राष्ट्रवादीला आणि गोवा फॉरवर्ड पार्टीला एकत्रितपणे द्या, असा प्रस्ताव कॉंग्रेसला दिला होता. आम्ही गोव्यात काँग्रेसनं कधीही न जिंकलेल्या जागा मागितल्या आहेत. जमिनीवरील परिस्थिती वेगळी आहे. एकत्र लढलो नाही तर काँग्रेस सिंगल डिजिटमध्ये सुद्धा येणार नाही, असं वातावरण आहे. त्यामुळं आमच्यासारखे काही प्रमुख पक्ष काँग्रेसला आधार द्यायचा प्रयत्न करत आहेत. पण गोव्यातल्या स्थानिक नेत्यांना प्रचंड आत्मविश्वास आहे, असं राऊत म्हणाले.  


उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे.  उत्तर प्रदेशच्या निवडणुका सात टप्प्यात पार पडणार आहेत. तर पंजाब, गोवा, उत्तराखंड राज्याच्या निवडणुका एकाच टप्प्यात पार पडणार आहेत. उत्तरप्रदेशात  पहिला टप्पा 10  फेब्रुवारी आणि दुसरा टप्पा 14 फेब्रुवारीला पार पडणार आहे. तर तिसरा, चौथा, पाचवा, सहावा आणि सातवा अनुक्रमे  20 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवार,  3 मार्च आणि 7 मार्चला पार पडणार आहे.  निवडणुकांचे निकाल 10 मार्चला येणार आहे. 



महत्त्वाच्या इतर बातम्या : 



मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह