UP Election 2022:  विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरूवात केली आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे. उत्तर प्रदेशमध्ये येत्या 10 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये 58 जागांसाठी मतदान होणार आहे.  पहिल्या टप्प्यात एकूण 623 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यातील 615 उमेदवारांपैकी 280 उमेदवार हे कोट्यधीश असल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजे 46 टक्के उमेदवार हे कोट्यधीश आहेत. 


येत्या 10 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यात 11 जिल्ह्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 623 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. या टप्प्यात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवार किती मालमत्तेचे मालक आहेत, याबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील 615 उमेदवारांपैकी 280 उमेदवार कोट्यधीश आहेत. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म या संघटनेने ही माहिती दिली आहे. विविध कारणांमुळे 8 उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण करण्यात आले नाही.


सर्वात श्रीमंत उमेदवार हे भाजपचे अमित अग्रवाल आहेत. ते मेरठ कॅंट मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी आपली संपत्ती 148 कोटींहून अधिक दाखवली आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर मथुरा मतदारसंघातील बसपचे उमेदवार एसके शर्मा आहेत. त्यांनी आपली संपत्ती 112 कोटींहून अधिक दाखवली आहे. तर बुलंदशहरच्या सिकंदराबाद मतदारसंघातून निवडणूक लडवणारे समाजवादी पार्टीचे उमेदवार राहुल यादव हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची संपत्ती 100 कोटींहून अधिक असल्याचे दाखवले आहे. कोट्यधीश उमेदवारांचा तपशीलवार विचार केला तर आपल्या लक्षात येईल की 5 कोटी किंवा त्याहून अधिक संपत्ती घोषीत केलेल्या उमेदवारांची संख्या  ही 104 आहे. त्याच वेळी, 2 कोटी ते 5 कोटी दरम्यान संपत्ती दर्शविणाऱ्या उमेदवारांची संख्या 84 आहे. तर 163 उमेदवारांनी 50 लाख ते 1 कोटीपर्यंतची संपत्ती दाखवली आहे. त्याचवेळी 10 लाख ते 50 लाखांपर्यंत संपत्ती दर्शविणाऱ्या उमेदवारांची संख्या ही 143 आहे. केवळ 121 उमेदवारांनी त्यांची संपत्ती 10 लाख रुपयांपेक्षा कमी दाखवली आहे.


दरम्यान, या टप्प्यात असे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत की ज्यांच्याकडे कोणतीही मालमत्ता नाही. अलिगडच्या अत्रौली मतदारसंघातून बहुजन मुक्ती पार्टीचे उमेदवार कैलाश कुमार यांनी आपली संपत्ती शून्य असल्याचे दाखवले आहे. त्याचप्रमाणे मुझफ्फरनगरच्या मीरापूर मतदारसंघातून राष्ट्र निर्माण पक्षाच्या उमेदवार कुमारी प्रीती यांच्याकडेही कोणतीही मालमत्ता नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.


महत्त्वाच्या बातम्या: