मुंबई : माझ्या मुलांसोबत इतरांच्या मुलांचेही हट्ट पुरवतो, म्हणून शिवसेना सर्वसामान्यांचा पक्ष, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना टोला लगावला. भाजप प्रवेशानंतर सुजय विखे पाटील उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी 'मातोश्री'वर आले होते.

इतरांच्या पोरांचाही मी विचार करतो. दुसऱ्यांची पोरं धुणीभांडी करण्यासाठी वापरुन घेत नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी पवारांवर बोचरी टीका केली. दोन्ही पक्षाकडून दगाफटका होणार नाही, अशी हमी यावेळी उद्धव ठाकरेंनी सुजय विखेंना दिली.

सुजय विखे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जातो. अमुक एका जागेचा हट्ट करतो. त्यांचा बालहट्ट पुरवण्याची जबाबदारी इतर पक्षांची नाही, आपल्या मुलाचा हट्ट ज्यानं त्यानं पुरवावा. माझ्या घरातला मुलांचा हट्ट मी पुरवेन, दुसऱ्याच्या मुलाचा हट्ट मी का पुरवू, असाटोला पवारांनी काल लगावला होता.
माझ्या घरातल्या मुलांचा हट्ट मी पुरवेन, दुसऱ्याच्या मुलाचा हट्ट मी का पुरवू, त्यांना काय वाटेल? : शरद पवार

शरद पवार हे अष्टपैलू आहेत. नेते म्हणून ते चांगले आहेत, पण भविष्य कधीपासून सांगायला लागले माहित नाही. ज्योतिषी म्हणून त्यांची ओळख नवीन आहे. जसं आम्ही बोलतो, ते करुन दाखवतो, तसं ते बोलल्याच्या विरुद्ध करतात, असा चिमटाही उद्धव ठाकरेंनी काढला.

लोकसभेची यादी लवकरच

लोकसभा उमेदवारांची यादी तयार आहे. एक-दोन दिवसात यादी जाहीर करणार आहोत. 48 पेक्षा जास्त जागा तर जिंकू शकत नाही, मात्र सर्वच्या सर्व जागा जिंकण्याचा प्रयत्न असेल, असंही उद्धव यांनी सांगितलं.

लोकसभेसाठी शिवसेनेचे महाराष्ट्रातील संभाव्य 23 उमेदवार




जालन्याच्या जागेच्या तिढा सुटण्याच्या मार्गावर आहे. माझ्याकडे ते येतील आणि समोरासमोर बोलणं होईल, त्यानंतर निर्णय होईल, असं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं. युतीत मिठाचा खडा कोण टाकू शकत नाही, असंही उद्धव यांना वाटतं.



आदित्य ठाकरे लोकसभेच्या रिंगणात नाहीत

आदित्य ठाकरे यांच्यावर माझं कोणतंही बंधन नाही. निवडणूक लढवायची की नाही, याचा निर्णय तो आणि शिवसैनिक घेतील. मात्र यंदा तरी तो निवडणूक लढवणार नाही, असं स्पष्टीकरण उद्धव यांनी दिलं.


जालन्याचा तिढा सुटला, दानवेच उमेदवार; ईशान्य मुंबईचं काय होणार?




निवडणुकीच्या रणनीतीचा कच्चा आराखडा काल तयार झाला, सर्व निर्णय झाले आहेत. आणखी बरेच पत्ते आहेत ते आता उघडायचे नाहीत, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.