नवी दिल्ली : बॉयफ्रेण्डच्या मदतीने आई-वडिलांची हत्या करणाऱ्या दिल्लीतील तरुणीला अटक करण्यात आली आहे. आरोपी तरुणीने वडिलांची हत्या केल्यानंतर दहा दिवस आईपासून त्यांचा मृत्यू लपवून ठेवला होता. त्यानंतर त्याच पद्धतीने तिने सख्ख्या आईचाही जीव घेतला.


54 वर्षीय गुरमीत सिंग यांच्याशी संपर्क होऊ शकत नसल्यामुळे त्यांची 43 वर्षीय पत्नी जगीर कौर काळजीत पडली होती. मात्र बाबांचा फोन तुटला आहे. त्यांनी नवा फोन घेतलेला नाही. ते कामात व्यस्त आहेत, असं कारण त्यांची 26 वर्षांची मुलगी दविंदर कौर देत असे.

दविंदर आणि तिचा बॉयफ्रेण्ड प्रिन्स दीक्षितने गुरमीत सिंग यांना गुंगीचं औषध देऊन नाक दाबून त्यांची हत्या केली होती. त्यांचा मृतदेह सुटकेसमध्ये भरुन एका गटारात फेकून देण्यात आला. वडिलांच्या मृत्यूनंतर लेकीने 21 फेब्रुवारी ते 2 मार्च असे तब्बल दहा दिवस हा लपंडाव सुरु ठेवला. दोन मार्चला जगीर कौर यांनाही दविंदर आणि प्रिन्स दीक्षितने त्याच पद्धतीने मारलं.

आठ दिवसांनी पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. दिल्लीच्या पश्चिम विहार भागातील 50 लाख रुपये किमतीचं घर विकण्यासाठी दोघांनी आई-वडिलांना जीवे मारल्याचा आरोप आहे.

दविंदरचा घटस्फोट झाला असून तिला तीन आणि पाच वर्षांची मुलं आहेत. नवऱ्याला सोडून माहेरी आलेली दविंदर वर्षभरापूर्वी आई-वडिलांच्या घरातूनही बाहेर पडली होती.

नोकरी शोधताना तिची ओळख प्रिन्सशी झाली. दविंदर आणि प्रिन्स यांचं नातं गुरमीत-जगीर यांना मान्य नव्हतं. ते कायम लेकीला त्यावरुन सुनवत असत. सहा महिन्यांपूर्वी दोघांनी संपत्ती गिळंकृत करण्यासाठी गुरमित-जगिर यांच्या हत्येचा कट शिजवला.

विशेष म्हणजे गुरमीत आणि जगीर यांना आणखी तीन मुलं आहेत. मात्र आपल्या आई-वडिलांच्या जीवाचं बरं वाईट झाल्याची कुणकुणही त्यांना लागली नव्हती.