मुंबई : मुंबईकरांना वाऱ्यावर सोडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे प्रचारासाठी अमरावतीला रवाना झाले आहेत. सीएसएमटीतील पूल अपघाताला कित्येक तास उलटूनही ना उद्धव ठाकरे घटनास्थळाकडे फिरकले, ना आदित्य ठाकरेंनी जखमींची विचारपूस केली.


मुंबईतील सीएसएमटी स्टेशनजवळ काल संध्याकाळी साडेसात वाजता मुंबई महापालिकेचा पूल कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला, तर 31 जण जखमी झाले. मात्र मुंबईचे कारभारी समजणाऱ्या उद्धव ठाकरेंनी घटनास्थळाला भेट देण्याचं किंवा जखमींची विचारपूस करण्याचं सौजन्य दाखवलं नाही.

ज्या मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकत आहे, त्याच महापालिकेच्या निष्काळजीमुळे पुलाचा भाग कोसळल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. अशा परिस्थितीत उद्धव आणि आदित्य यांनी केलेलं दुर्लक्ष असंवेदनशीलतेचं मानलं जात आहे.
CSMT पूल दुर्घटना | महापालिका आयुक्तांचे दक्षता विभागाला चौकशीचे आदेश

निवडणुका तोंडावर आल्याने प्रचाराला जाण्यात काहीच चूक नाही. मात्र ज्या 'मातोश्री'वर उद्धव ठाकरे राहतात तिथून घटनास्थळ फक्त 18 किलोमीटरवर आहे. परंतु मतांच्या बेगमीसाठी उद्धव ठाकरेंनी तब्बल साडेपाचशे किलोमीटरवर असलेली अमरावती जवळ केली.

शिवसेना-भाजप युतीच्या संयुक्त प्रचारसभेला उद्धव यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उपस्थिती लावली आहे. मुख्यमंत्र्यांनी जे निर्णय घेतले, ते राष्ट्रहिताचे होते, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं. मात्र पूल दुर्घटनेविषयी चकार शब्दही काढला नाही.

दुसरीकडे महापालिकेने अद्यापही या दुर्घटनेबद्दल कुणावर ठोस कारवाई केलेली नाही. त्यामुळे महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांना अटक करा, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे.