मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले, अनेक दिग्गजांना पराभव स्वीकारावा लागला. महायुतीने मुसंडी मारत 236 जागा जिंकल्या असून भाजपने 137 जागांवर बाजी मारली. उद्धव ठाकरे गटाच्या 20 जागा आल्या तर मनसेचा एकाही ठिकाणी उमेदवार निवडून आला नाही. पण उद्धव ठाकरेंच्या जवळपास 10 जागा या मनसेच्या उमेदवारामुळे जिंकल्याचं आकडेवारीतून स्पष्ट होतंय. त्या ठिकाणी मनसेच्या उमेदवाराने हजारोंनी मतं घेतली आणि त्यामुळे भाजप महायुतीच्या उमेदवाराचा पराभव झाल्याचं दिसून आलं.
आदित्य ठाकरे ज्या वरळीमध्ये उभे होते त्या ठिकाणी त्यांचा 8,801 मतांनी विजय झाला. आदित्य ठाकरे यांना 63,324 मतं मिळाली. त्या ठिकाणी मनसेच्या संदीप देशपांडे यांनी 19 हजारांहून अधिक मतं घेतली. तर शिंदे गटाच्या मिलिंद देवरा यांना जवळपास 55 हजार मतं मिळाली.
माहीममध्येही ठाकरेंच्या महेश सावंत यांचा 1,316 मतांनी विजय झाला. त्यांनी शिंदे गटाच्या सदा सरवणकर यांचा पराभव केला. पण माहीमध्ये मनसेच्या अमित ठाकरे यांनी 33 हजारांहून जास्त मतं घेतली. मनसेने महायुतीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली असती किंवा महायुतीचा एकच उमेदवार उभा असता तर त्या ठिकाणी ठाकरे गटाला ही जागा जिंकला आली नसती अशी चर्चा आहे.
वांद्रे पूर्वमध्ये ठाकरेंच्या वरुण सरदेसाई यांचा 11 हजार मतांनी विजय झाला. त्यांनी महायुतीच्या झिशान सिद्दिकी यांचा पराभव केला. पण त्या ठिकाणी मनसेच्या तृप्ती सावंत यांनी 16,074 मतं घेतली. वर्सोवामध्ये ठाकरेंचे हारुन खान हे 1,600 मतांनी विजयी झाले. त्या ठिकाणी मनसेच्या उमेदवाराने 6,752 मतं घेतल्याने भाजपच्या भारती लवेकरांना पराभव स्वीकारावा लागल्याचं सांगितलं जातंय.
कलिनामध्येही मनसेच्या बाळकृष्ण हुटगी यांनी 6,062 मतं घेतली. त्याचवेळी शिवसेनेच्या संजय पोतनीस यांनी 59,820 मत घेतली. त्यांनी भाजपच्या अमरजीत सिहांचा 5 हजार मतांनी पराभव केला. दिंडोशीमध्ये ठाकरे गटाच्या सुनील प्रभूंचा 6 हजार मतांनी विजय झाला. त्या ठिकाणी मनसेच्या भास्कर परबांनी 20,309 मतं घेतल्याने शिवसेना शिंदे गटाच्या संजय निरूपम यांचा पराभव झाल्याची चर्चा आहे.
जोगेश्वरी पूर्वमध्ये ठाकरे गटाच्या अनंत नर यांनी फक्त 1,541 मतांनी विजय मिळवला. त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या मनिषा वायकरांचा पराभव केला. त्या ठिकाणी मनसेच्या भालचंद्र अंबुरे यांनी 12,805 मतं घेतली. त्याचा फटका महायुतीला बसल्याची चर्चा आहे.
मुंबई व्यतिरिक्त कोकणातील गुहागर मतदारसंघातही मनसेच्या उमेदवारांमुळे ठाकरेंचे उमेदवार निवडून आल्याचं दिसून येतंय. गुहागरमध्ये भास्कर जाधव यांना केवळ 2,830 मताधिक्य मिळालं. त्या ठिकाणी मनसेच्या प्रमोद गांधी यांनी तब्बल 6,712 मतं मिळवली.