स्वतः पंतप्रधान मोदी यावेळी देखील विक्रमी मतांनी वाराणसीमधून विजयी झाले. या निवडणुकीत काही उमेदवारांनी लाखांच्या मतांच्या अंतराने तर काहींना मात्र काही शे आणि हजाराच्याच मतांनी विजय मिळाला.
देशातून सर्वात जास्त मतांच्या आघाडीवर टॉप पाच जे उमेदवार आहेत, ते भाजपचेच आहेत. देशातून सर्वाधिक मतांच्या अंतराने गुजरातमधील नवसारी लोकसभा मतदारसंघातून भाजपचे सी. आर. पाटील हे तब्बल 6,78,545 मतांनी विजयी झाले. कर्नाल हरियाणा येथून भाजपचेच संजय भाटीया 6, 54, 269 दुसऱ्या क्रमांकाची मतांची आघाडी घेत विजयी झाले. त्यानंतर राजस्थान भिलवाडा येथून सुभाषचंद्र बहेरीया हे 6, 37920 मतांनी तर हरियाणाच्या फरिदाबाद येथून कृष्णा पाल हे 6,36,032 मतांनी तर रंजनबेन भट्ट 5,87825 मतांनी विजयी झाले.
तर सर्वात कमी मतांनी उत्तर प्रदेशातील मच्छलीशेर येथून बी. पी. सरोज उर्फ भोलेनाथ हे केवळ 181 मतांनी निवडून आले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्षद्विपचे मोहम्मद फैजल हे 823 मतांनी निवडून आले. तर अंदमान निकोबारमधून काँग्रेसचे कुलदीप राय शर्मा 1074 मतांनी निवडून आले. यानंतर बिहारच्या जहानाबाद येथून जेडीयूचे चंदेश्वर प्रसाद 1075 मतांनी निवडून आले. तर हरियाणाच्या रोहतकमधून भाजपचे अरविंदकुमार शर्मा हे 2636 मतांनी विजयी झाले.
महाराष्ट्रातून जळगावमधून भाजपचे उन्मेष पाटील हे सर्वाधिक मतांच्या आघाडीने विजयी झाले तर औरंगाबादमधून एमआयएमचे इम्तियाज जलील हे सर्वत्र कमी इतक्या मतांनी विजयी झाले आहेत.
देशात भाजपने 303 जागा जिंकल्या आहेत. तर एनडीएने 352 जागा जिंकल्या आहेत. एनडीएचा हा विजय 2014 पेक्षाही मोठा असल्यामुळे जगभरातून मोदींवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मोदी 30 मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतील अशी शक्यता आहे.
दरम्यान जनतेने काँग्रेससह महाआघाडीला मोठा दणका दिला आहे. काँग्रेस पुरस्कृत संयुक्त पुरोगामी आघाडीला (युपीए) केवळ 87 जागांवर आघाडी मिळाल्याचे दिसत आहे. तर अन्य पक्षांनी 103 जागा जिंकल्या आहेत.
महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 41 जागा भाजप-शिवसेना युतीने जिंकल्या आहेत. त्यापैकी भाजपने 23 तर शिवसेनेने 18 जागा जिंकल्या आहेत. त्यासोबत राष्ट्रवादीला 5, काँग्रेसला 1 आणि वंचित बहुजन आघाडीला 1 जागा जिंकता आली आहे.