मुंबई : 'टॉयलेट मॅन' म्हणून ओळखले जाणारे साताऱ्याचे उद्योजक रामदास माने हे माढा लोकसभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढणार आहेत. साताऱ्यातील एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा ते एक प्रसिद्ध आणि यशस्वी उद्योजक असा त्यांचा मोठा प्रवास साताऱ्यासह राज्यभरातील लोकांनी पाहिला आहेत. माढ्याचा विकास करण्याचे ध्येय घेऊन माने लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. पेनाची निब हे त्यांचे निवडणूक चिन्ह आहे. माढा मतदार संघात माने यांचा सामना राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे आणि भाजपचे उमेदवार रणजीतसिंह निंबाळकर यांच्यासोबत होणार आहे.

रामदास माने यांनी निवडणूक लढवण्याचे ठरवल्यानंतर स्वतःचे मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, माढा मतदार संघात गेल्या अनेक वर्षांपासून आपण भोगलंय. अनेक सरकारे आलीत आणि गेलीत, परंतु प्रचंड बेरोजगारी आणि काही भागात सतत पडणाऱ्या दुष्काळाने सर्व लोक त्रस्त झाले आहेत.

माने यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार करावा व तुम्हाला (नागरिकांना) योग्य वाटेल त्या उमेदवाराला निवडून द्या. तसेच जो उमेदवार बेरोजगारीची आणि दुष्काळाची कायम स्वरुपी तीव्रता कमी करु शकेल, अशा उमेदवारास तुमचे मत द्या.

माढा मतदार संघातल्या माण तालुक्यातील लोधवडे हे रामदास माने यांचे मूळ गाव आहे. त्यांचा जन्म लोधवडे येथील एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत त्यांनी 10 वी पर्यंतचे शिक्षण घेतले. गावी केवळ कोरडवाहू शेती असल्यामुळे ते नोकरीसाठी पुण्याच आले. तिथे त्यांनी सुरुवातीला लहानसा उद्योग सुरु केला. काही वर्षांपूर्वी त्यांनी जगातले सर्वात मोठे थर्माकॉल तयार करणारे मशीन बनवले.

संपूर्ण भारतात आणि जगभरातील 45 देशात माने थर्माकॉल बनवण्याचा प्लान्ट, मशीनरीसह थर्माकॉल निर्यात करतात. थर्माकॉलपासून रेडिमेड आरसीसी टॉयलेट बनवून देशातल्या 17 राज्यांमध्ये ना नफा ना तोटा या तत्वावर देत आहेत. आतापर्यंत त्यांनी 23 हजार टॉयलेट्स पुरवली आहेत. माने यांनी 25 नववधूंच्या विवाहात मोफत शौचालय देऊन एक सामाजिक संदेश दिला होता.

माझा कट्टा : उद्योगपती रामदास माने यांच्यासोबत प्रेरणादायी गप्पा