मुंबई : एकीकडे कोल्हापूरचा सिद्धार्थ देसाई हा प्रो कबड्डी लीगच्या सातव्या मोसमातील सर्वात महागडा खेळाडू ठरला असताना, पीकेएलमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व करणाऱ्या यू मुंबा संघात महाराष्ट्रातील केवळ एकाच खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. अजिंक्य रोहिदास कापरे हा यू मुंबा संघातील एकमेव महाराष्ट्रीयन खेळाडू आहे.


प्रो कबड्डी लीगच्या सातव्या मोसमासाठी मुंबईत सोमवार (8 एप्रिल) आणि मंगळवारी (9 एप्रिल) खेळाडूंचा लिलाव झाला. पीकेएलच्या नव्या मोसमाला 19 जुलै 2019 पासून सुरुवात होणार आहे.

प्रो कबड्डी लीग 2019 लिलाव : कोल्हापूरच्या सिद्धार्थ देसाईला सर्वात मोठी बोली

मुंबईतील दादरचा रहिवासी असलेल्या 24 वर्षीय अजिंक्य कापरेला यु मुंबा संघाने विकत घेतलं. यु मुंबाने त्याच्यासाठी 10.25 लाख रुपयांची बोली लावली. याआधी रिशांक देवाडिगा, काशीलिंग आडके, विशाल माने, नितीन मदने, सिद्धार्थ देसाई हे महाराष्ट्राचे खेळाडू यू मुंबासाठी खेळले आहेत.

अजिंक्य कापरे हा मुंबईतील दादरच्या विजय क्लबचा अष्टपैलू खेळाडू आहे. प्रो कबड्डी लीगच्या चौथ्या मोसमात अजिंक्यची तेलुगू टायटन्स संघात निवड झाली होती. तर त्याच मोसमात अजिंक्य यू मुंबा फ्युचर स्टार प्लेअर ऑफ द टूर्नामेंट ठरला होता. याशिवाय डिसेंबर 2017 मध्ये हैदराबादमधील राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात अजिंक्य कापरेचा समावेश होता. रिशांक देवाडिगाने या संघाचं नेतृत्त्व केलं होतं. महाराष्ट्राने 11 वर्षांनी या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं.

यू मुंबा संघ

रेडर : अर्जुन देशवाल, रोहित बनियाल, डोंग जिओन ली, विनोद कुमार, अतुल एमएस, गौरव कुमार

डिफेंडर : फजल अत्राचली, राजगुरु सुब्रमण्यन, सुरिंदर सिंह, यंग चँग को, हरेंद्र कुमार, हर्ष वर्धन, अनिल

अष्टपैलू : संदीप नरवाल, मोहित बलियान, अजिंक्य रोहिदास कापरे