पंढरपूर : लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपचं काँग्रेसला धक्कातंत्र सुरुच आहे. काँग्रेस नेते कल्याणराव काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. कल्याण काळेंसोबतच माजी नगराध्यक्ष दगडू घोडके, सुरेखा पवार यांनीही भाजपचा झेंडा हाती धरला.


माढा लोकसभा मतदारसंघात भाजपची मदत घेऊन मोठे झालेल्या संजयामामा शिंदे यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीत प्रवेश करुन उमेदवारी घेतल्याचा राग भाजपला जिव्हारी लागला आहे. यातूनच शिंदेंना पराभूत करण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे.
महाआघाडीला मोठा धक्का, राधाकृष्ण विखे पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटलांचा भाजपप्रवेश?

कल्याण काळेंनी माढ्यातील गेल्या विधानसभा निवडणुकीत तब्बल 65 हजार मतं घेतली होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर आघाडीपुढील अडचणीत मोठी वाढ होणार आहे.


VIDEO | काँग्रेस आमदार जयकुमार गोरेंचा भाजपला पाठिंबा | माढा


कल्याणराव काळे हे पंढरपूरचे तरुण नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडे दोन साखर कारखाने आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत कल्याणराव काळे यांनी राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांच्याविरोधात तब्बल 65 हजार मतं घेत त्यांना अडचणीत आणलं होतं. आता काळे भाजपमध्ये गेल्यास संजय शिंदेंसमोरच्या अडचणीतही मोठी वाढ होणार आहे.

आदल्याच दिवशी काँग्रेसचे माण खटावमधील आमदार जयकुमार गोरे यांनीही माढ्यातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा दिला होता.
माढ्यात राजकीय नाट्य, काँग्रेस आमदाराचा भाजप उमेदवाराला पाठिंबा

पश्चिम महाराष्ट्रात वर्चस्व असलेली मोठमोठी घराणी आघाडीची साथ सोडत सत्ताधारी भाजपच्या गोटात सामील होत आहेत. यापूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे, वसंतदादा पाटील यांचे नातू प्रतीक पाटील, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपचा झेंडा हाती धरला आहे. तर राष्ट्रवादीचे रणजितसिंह मोहिते पाटीलही राष्ट्रवादीला सोडून भाजपमध्ये सामील झाले आहेत. पुढच्या आठवड्याभरात खुद्द विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि विजय सिंह मोहिते पाटीलही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.