UP 7th Phase Election : निवडणुका होत असलेल्या पाच राज्यांपैकी महत्त्वाचे राज्य म्हणजे उत्तर प्रदेश. आत्तापर्यंत उत्तर प्रदेशमध्ये मतदानाचे सहा टप्पे पार पडले आहे. आता केवळ एकाच टप्प्यातील मतदान प्रक्रिया बाकी राहिली आहे. अखेरच्या सातव्या टप्प्यासाठी 7 मार्चला मतदान होणार आहे. यासाठी सुरु असलेल्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या प्रचाराचा आज अखेरचा दिवस असणार आहे. गेल्या महिनाभरापासून निवडणुकांची रणधुमाळी सुरु होती. हा प्रचाराचा आखाडा आज अखेर संपणार आहे. आजच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह दिग्गजांच्या जाहीर सभा होणार आहेत.
 
सर्वच राजकीय पक्षांचे नेते प्रचारात व्यस्त आहेत. दरम्यान, गेल्या दोन दिवसापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. काल पंतप्रधानांनी वाराणसीत रोड शो केला. आजही पंतप्रधान मोदी वाराणसीमध्ये मोठ्या जनसभेला संबोधित करणार आहेत. गृहमंत्री अमित शाह जौनपूरमध्ये रॅली घेणार आहेत, तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे भदोहीमध्ये प्रचार सभा घेणार आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, सीएम योगी सोनभद्र, भदोही आणि आझमगडमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. तर समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव हे आझमगढ, मिर्झापूर आणि जौनपूरमध्येही सभा घेणार आहेत. निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यातील 54 जागांसाठी मतदान होणार आहे. चकिया, रॉबर्टसगंज आणि दुड्डी या जागांसाठी होणारा प्रचार आज 4 वाजता संपणार आहे, तर उर्वरित 51 जागांवर प्रचार आज संध्याकाळी 6 वाजता संपणार आहे.


आज पंतप्रधान मोदी वाराणसी येथील खजुरी गावात दुपारी जाहीर सभा घेणार आहेत.
गृहमंत्री अमित शाह आज यूपीच्या जौनपूरमध्ये जाहीर सभा घेतील.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आज यूपीच्या भदोहीमध्ये प्रचार करणार आहेत. त्यांची ज्ञानपूरमध्ये जाहीर सभा होणार आहे. 
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आज सोनभद्र, भदोही आणि आझमगडमध्ये सभा घेणार आहेत. ते आज 5 जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. दुपारी 3 नंतर ते लखनऊमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत.
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या आज आझमगड, मिर्झापूर आणि जौनपूर येथे प्रचार सभा घेणार आहेत. तर पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत निवडणूक चर्चाही ते करणार आहेत.
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि अनुराग ठाकूरसुद्धा प्रचार करणार आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या: